नवी मुंबईकरांसाठी १ डिसेंबरपासून अभय योजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या अभय योजनेची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे.

नवी मुंबई : शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने तयार केलेल्या अभय योजनेची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवल्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ ला राज्य सरकारने पालिकेच्या अभय योजनेला हिरवा कंदील दर्शवला होता. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका आल्यामुळे त्यांची अंमलबजावणी थांबवण्यात आली होती; परंतु आता निवडणूक संपल्यानंतर पालिकेतर्फे या योजनेच्या अंमबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या १०९ चौरस किलोमीटरच्या हद्दीत गावठाण, विस्तारित गावठाण, शहरी, निवासी, वाणिज्यिक व व्यावसायिक अशा स्वरूपाच्या एकूण ३ लाख २० हजार इतक्‍या मालमत्ता आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १२७ व १२९ अन्वये मालमत्ता कराची आकारणी करून प्रकरण ८ नियम ३९ नुसार करवसुलीचे देयके मालमत्ताधारकांना देण्यात येतात. परंतु संबंधितांनी मुदतीत मालमत्ताकराचे देयके चुकते केले नाही, तर त्यावर २०१० महाराष्ट्र महापालिका अधिनियम प्रकरण ८ मधील नियम ४१ अन्वये प्रतिमहिना २ टक्के दंड आकारला जातो. त्यानुसार महापालिका स्थापनेपासून २०१९ पर्यंत तब्बल एक लाख ४५ हजार ८८७ मालमत्ताधारकांनी वर्षातून दोन वेळा होणारे करनिर्धारणानंतर देयके चुकती केलेली नाहीत. वेळेवर कर अदा न केल्यामुळे महापालिकेचे दोन हजार ४५० कोटींची थकबाकी झाली. एवढी मोठी रक्कम मिळाल्यास पालिकेचे अनेक प्रकल्प मार्गी लागू शकतात. त्यामुळे पालिकेने वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलली होती. बॅंक खाती गोठवणे, मालमत्तांना सिल ठोकणे आदी कारवाई केल्यानंतरही थकबाकी वसूल होत नाही. याउलट काही मालमत्ताधारकांनी कोर्टात धाव घेतल्याने पालिकेच्या कारवाईवर कोर्टाचे स्थगिती आदेश आल्याने दोन हजार कोटींची वसुलीही अडचणीत आली. थकबाकी असलेल्या मालमत्ताधारक व महापालिका या दोघांनाही फायदा होईल. असा मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व व्यापाऱ्यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता.  

अशी असेल योजना?
-अभय योजनेचा चार महिन्यांचा कालावधी असेल. 
-पहिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराच्या रक्कमेसोबत २५ टक्के दंडाची रक्कम भरल्यास ७५ टक्के दंड माफ.
-त्यापुढील दोन महिन्यांची थकीत मालमत्ताकर रकमेसोबत ३७.५ टक्के दंड भरल्यास ६३.५ टक्के दंड माफ.
-योजनेत सूट हवी असल्यास थकबाकीदारांना अर्ज करावा लागणार आहे.

थकबाकीदारांची आकडेवारी
-एकूण ३ लाख मालमत्ता करधारक
-२४५० कोटींची थकबाकी 
-एकूण एक लाख ४५ हजार ८८७ थकबाकीदार
-६८ हजार ६३३ गावठाणातील
-१५ हजार ८०१ विस्तारित गावठाणातील
-५८ हजार ९९१ सिडको वसाहतींमधील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhay Yojana for Navi Mumbai from 1st December