'ठाकरे'चे दिग्दर्शक पानसे चित्रपट न पाहताच निघून गेले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

या स्क्रिनिंगला राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे स्क्रिनिंग दिग्दर्शक अभिजीत पानसे येण्याआधीच सुरू करण्यात आले. पानसे यांना निर्माते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने पहिल्या रांगेत बसविणे अपेक्षित होते. मात्र पानसे चित्रपटगृहात आल्यानंतर त्यांना व त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना बसण्यासाठी योग्य जागा न ठेवल्याने ते नाराज होऊन निघाले. यावेळी राऊत यांनी पानसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपटगृहाबाहेर पडले.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील "ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियर बुधवारी सायंकाळी वरळी येथे ठेवण्यात आला होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे मधूनच निघून गेले. निर्माते-खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपट न पाहताच तिथून निघाले. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मान-अपमानाचे नाट्य पाहायला मिळाले. 

या स्क्रिनिंगला राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे स्क्रिनिंग दिग्दर्शक अभिजीत पानसे येण्याआधीच सुरू करण्यात आले. पानसे यांना निर्माते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने पहिल्या रांगेत बसविणे अपेक्षित होते. मात्र पानसे चित्रपटगृहात आल्यानंतर त्यांना व त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना बसण्यासाठी योग्य जागा न ठेवल्याने ते नाराज होऊन निघाले. यावेळी राऊत यांनी पानसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपटगृहाबाहेर पडले. "या चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्याने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि निर्माते संजय राऊत यांच्याबरोबरीने बसवण्याची अपेक्षा होती. माझ्याबरोबर काही मंडळी होती. त्यांचीही बैठक व्यवस्था नीट केली नव्हती. असा अपमान दरवेळी सहन करून घेणार नाही,' अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमधूनही पानसे यांना डावल्याची चर्चा होती. चित्रपटाच्या म्युझिक लॉंचच्या वेळीही पानसे अनुपस्थित होते. तेव्हा राऊत यांना पानसे म्युझिक लॉंचला उपस्थित का नाहीत? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा ते "ठाकरे'च्याच मराठी डबिंगमध्ये व्यस्त असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे बोलले जात होते.

Web Title: Abhijit Panse Walks Off From The Screening Of Thackeray in Mumbai