निरोधाच्‍या पाकिटांसोबत गर्भपाताचे किट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपातच्या गोळ्यांचे किट विकण्यावर बंदी असतानाही ऑनलाईन विक्री माध्यमातून निरोधाच्या पाकिटांसोबत गर्भपाताच्या गोळ्या सर्रास विकल्या जात असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई : डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपातच्या गोळ्यांचे किट विकण्यावर बंदी असतानाही ऑनलाईन विक्री माध्यमातून निरोधाच्या पाकिटांसोबत गर्भपाताच्या गोळ्या सर्रास विकल्या जात असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अशा ऑनलाईन होणाऱ्या बेकादा विक्रीवरून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर कंपन्यांचा छुपा बाजार समोर आला आहे.

गर्भपाताच्या गोळ्यांचे ऑनलाईन किट विकले जात असल्याचा प्रकार महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनने उघड केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या विक्रीवर अंकुश आला होता; मात्र ऑनलाईन कंपन्यांनी याला नवा पर्याय शोधून काढला आहे, अशी माहिती फार्मासिस्ट असोसिएशनचे कैलास तांदळे यांनी दिला.

पुण्यातील एका परिचित व्यक्तीला निरोधासह गर्भपाताच्या गोळ्या सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्या. याबाबत माहिती मिळताच २१ जुलै रोजी ऑनलाईन ऑर्डर दिली. शनिवारी (ता. २७) हे पॅक घरी आले, असेही तांदळे यांनी सांगितले. ही ऑर्डर उत्तर प्रदेशातील वित्तल या केमिस्ट दुकानातून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार वेळीच नियंत्रणात नाही आणला तर महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल, अशी भीती तांदळे यांनी व्यक्त केली. याबाबत सोमवारी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती तांदळे यांनी दिली.

डॉक्‍टरांचा सल्ला आवश्‍यकच
या गोळ्यांचा प्रभाव व्यक्तीसापेक्ष असतो. त्यामुळे त्यांचे डॉक्‍टरी सल्ल्यानुसार किती सेवन करायचे हे ठरते. डॉक्‍टराचा सल्ला न घेताच गोळ्या वापरल्यास प्रसंगी अतिरक्तस्राव होऊ शकतो. त्यातून जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे एका डॉक्‍टरने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abortion Kit With Protective Pockets