गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास ऑनलाईन विक्री 

गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास ऑनलाईन विक्री 

मुंबई - डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना गर्भपाताच्या गोळ्यांची ऑनलाईन विक्री होत आहे. हे संकेतस्थळ आणि उत्तर प्रदेशातील विक्रेत्याला अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस्‌ असोसिएशनने केली आहे. 

देशभरात बंदी असतानाही अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी केली जाते. संकेतस्थळांवर अवघ्या 300 रुपयांत मिळणाऱ्या या औषधांचा वापर अवांछित स्त्रीभ्रूण नष्ट करण्यासाठी केला जात असावा, अशी शक्‍यता व्यक्त केली जाते. डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकली जाणारी औषधे घातक ठरू शकतात. म्हणून अशाप्रकारे औषधांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने धोरणाचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. 

केंद्र सरकारने औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर तात्पुरती बंदीच घातली असली, तरी एका प्रसिद्ध संकेतस्थळावर गर्भपाताच्या गोळ्या उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांना 22 मे रोजी आढळले. उत्तर प्रदेशातील विठ्ठल ड्रग स्टोअरकडून या औषधाचा पुरवठा संबंधित संकेतस्थळाला केला जातो. ऑनलाईन मागणी नोंदवल्यानंतर आठवडाभरात या औषधाचे पार्सल तांदळे यांना मिळाले. असाच अनुभव पिंपरी-चिंचवड येथील विवेक तापके यांनाही आला. 

औषध नियमन कायद्यातील सूची क्र. 6 मध्ये गर्भपाताच्या औषधांचा समावेश आहे. या सूचीतील औषधे डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाहीत, त्यामुळे नियम डावलून ऑनलाईन औषधे विकणाऱ्या संकेतस्थळावर आणि पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी तांदळे यांनी केली आहे. दरम्यान, देशभरात ऑनलाईन मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या संकेतस्थळाच्या प्रवक्‍त्याने गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीला उत्पादकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन करणे घातक ठरते. काही गर्भवतींना रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घ्याव्यात. 
- डॉ. बिपीन पंडित, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, माजी अध्यक्ष, द मुंबई ऑब्स्ट्रेटिक्‍स अँड गायनाकोलॉजिकल सोसायटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com