लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

लग्नाच्या भूलथापा देऊन बदलापूर येथील एका 25 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली - लग्नाच्या भूलथापा देऊन बदलापूर येथील एका 25 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा लग्नाला तयार होत नसल्याने मुलीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महेंद्र भोईर (वय 27) याच्या विरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेंद्र हा केडीएमसीमधील माजी नगरसेविकेचा तसेच माणेरे गावचे माजी सरपंचाचा मुलगा आहे.

पिडीत मुलगीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सदर मुलगी ही बदलापूर पूर्व येथे राहण्यास असून पूर्वी ती उल्हासनगर येथे रहावयास होती. 2017 साली तिची माणेरे गावातील महेंद्र याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. यातून त्यांचे शारीरीक संबंध आले, दरम्यान तिला त्रास होत असल्याचे तिने सांगताच महेंद्र याने तिला लग्नाचे आमिष दाखवून ही गोष्ट कोणालाही न सांगण्यास सांगितले. त्यानंतर वारंवार विविध ठिकाणी तिला घेऊन जाऊन त्याने तिच्याशी संबंध बनविले. सप्टेंबर 2022 मध्ये त्याने तिच्याशी बोलणे बंद करत भेटण्यासही टाळाटाळ करु लागला. यामुळे पिडीता मानसिक तणावात होती. या तणावात तिने विषारी औषध ऑनलाईन घरी मागविले. त्यानंतर 20 सप्टेंबरला पुन्हा दोघांची भेट झाली यावेळीही महेंद्रने तिच्याशी संबंध बनवले.

यानंतर सदर मुलीने महेंद्रचे वडील यांच्या कार्यालयात जाऊन आमचे प्रेमसंबंध असून सर्व हकीकत सांगत मला त्याच्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले. यावर महेंद्रच्या वडीलांनी मी घरी चर्चा करुन सांगतो असे सांगितले. त्यानंतर 24 सप्टेंबरला सकाळी पुन्हा महेंद्र पिडीत मुलीला भेटला त्यांच्यात संबंध झाले. मुलीने त्याला मला कॉलेज जवळ सोड असे सांगितले. दरम्यान यावेळी पिडीतेने महेंद्रच्या गाडीवर असतानाच पर्स मधील विषारी औषध प्राशन केले. ती चक्कर येऊन पडताच महेंद्रने तिला पाणी पाजले असता तिला उलट्या झाल्या यावर तिने आपण विषारी औषध पिल्याचे महेंद्रला सांगताच त्याने तिला घरी नेऊन सोडले. त्यानंतर मुलीने स्वतः 100 नंबर क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना मला मदत हवी असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरी येऊन मुलीला बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी पिडीतेला उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलला पाठविले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पिडीतीने बदलापूर पोलिस ठाण्यात महेंद्र याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र हा केडीएमसीच्या माजी नगरसेविकेचा तसेच माणेरे गावचे माजी सरपंचाचा मुलगा असून ते शिंदे गट समर्थक असल्याची चर्चा आहे.