लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरील छायाचित्रांचा मॉर्फ करून गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी 3 यू-ट्युबच्या चॅनल्सविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चॅनल्सवर बीभत्स छायाचित्रेही वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मुंबई : लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी 3 यू-ट्युबच्या चॅनल्सविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चॅनल्सवर बीभत्स छायाचित्रेही वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यू-ट्युब चॅनल्स चालवणाऱ्यांकडून या प्रसिद्ध संकेतस्थळासह फेसबुकवरूनही काही तरुणींची व महिलांचे छायाचित्र चोरून विनापरवानगी त्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या तरुणी लग्नासाठी साथीदारांच्या शोधात असल्याचे चित्रफितींमध्ये दाखवण्यात आले आहे. अधिक ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी या चॅनल्सने हा प्रकार केल्याचा संशय आहे. मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. याप्रकरणी संकेतस्थळाच्या सहायक संचालक उषा विनोद कुमार (40) यांनी तक्रार केली होती.

यातील काही छायाचित्रे मॉर्फ करण्यात आल्याचाही संशय आहे. त्याच्या साह्याने चित्रफीत बनवण्यात आल्या आहेत. तक्रारीनुसार हा प्रकार शादी के जे, दील यूआर व ऑनलाईन शादी या यू-ट्युब चॅनल्सने हा प्रकार केला आहे. या यू-ट्युब चॅनल्सचे अनुक्रमे 83 हजार, 61 हजार व 12 हजार फॉलोअर्स आहेत. या चित्रफितींचे छायाचित्र पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे कंपनीची बदनामी होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

त्यामुळे भा.दं.वि. कलम 500(बदनामी करणे) सह माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 43(ब) (परवानगीशिवाय संगणकावरील अथवा इंटरवेटवरील माहिती वापरणे) व 67 (अ) (बीभत्स छायाचित्र अथवा चित्रफीत प्रसिद्ध करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यू-ट्युबकडे संबंधित चॅनल्सबाबतची माहिती मागितली असून त्यानंतर तपासाला वेग मिळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of photographs on wedding match sites