खंडणीसाठी 21 वर्षीय तक्रारदाराचे नग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अनिश पाटील
Tuesday, 12 January 2021

जीएसटी अधीक्षकाकडे सायबर खंडणीची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका चहा कंपनीच्या मालकाकडेही अशी खंडणीची मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

मुंबई - जीएसटी अधीक्षकाकडे सायबर खंडणीची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका चहा कंपनीच्या मालकाकडेही अशी खंडणीची मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेने 21 वर्षीय तक्रारदाराचे नग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

तक्रारदार मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी आहे. ओकेक्‍युपिड या डेटिंग अप्लिकेशनद्वारे त्याची ओळख रिद्धी श्रीवास्तव नावाच्या 25 वर्षीय तरुणीशी झाली होती. तेथे बराच काळ चॅटिंग केल्यानंतर तिने तक्रारदाराकडे त्याचा मोबाईल क्रमांक मागितला. तो दिल्यानंतर 11 जानेवारीला तक्रारदाराला त्या तरुणीचा व्हिडीओ कॉल आला. तेथे बोलणे सुरू असताना तरुणीने त्याला नग्न होण्यास सांगितले. तक्रारदार नग्न झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग करण्यात आली. त्यानंतर त्याला धमकीचा दूरध्वनी आला. बदनामी टाळायची असेल तर पैसे दे, अशी मागणी तरुणीने केली. त्या वेळी फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. डेटिंग ऍप्लिकेशनवर मैत्री करणारी तरुणी प्रत्यक्षात सायबर खंडणी मागणाऱ्या टोळक्‍याची सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी समाजमाध्यमांवर त्याची छायाचित्र अपलोड करून त्याची बदनामी केली. यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 384 (खंडणी), 503 (बदनामी करण्याची भीती दाखवून धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी फेसबुकवर महिलेसोबत झालेल्या मैत्रीनंतर तिने नग्न अवस्थेत व्हॉट्‌सऍप कॉल करून त्याच्या चित्रीकरणाच्या साह्याने वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधीक्षकाकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जीएसटी अधीक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. 
बदनामीच्या भीतीने अनेक जण त्यांना परस्पर पैसे देतात. अनेक वेळा ही खंडणी आभासी चलनामध्ये (क्रिप्टोकरन्सी) मध्ये मागण्यात येते. त्यामुळे पैसे भरल्यानंतरही आरोपीचा माग काढणे कठीण होऊन बसते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
abused photo of 21 year old complainant for ransom circulated on social media

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abused photo of 21 year old complainant for ransom circulated on social media