भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

तीन जण जखमी; पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचा चुराडा
मुंबई - पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींवर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षकेश वर्मा (वय 45), राजकुमार वर्मा (वय 8), अनारा वर्मा (वय 35), राजश्री वर्मा (वय 35), रागिणी वर्मा (वय 20), आशा वर्मा (वय 12) अशी मृतांची नावे आहेत.

हर्षकेश वर्मा हा सुरत येथे पत्नी आणि मुलांसह राहत होता. तो तेथील मिलमध्ये रंगारी म्हणून कामाला होता. कामानिमित्त तो मुंबईला ये-जा करत असे. शुक्रवारी तो पत्नी आणि तीन मुलांसोबत वडाळ्याला मंगरू या भावाकडे राहायला आला. दिवाळीत भावाकडे राहून हर्षकेशचे कुटुंब रविवारी पुन्हा सुरतला जाणार होते. मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी सकाळी मंगरू वर्माने एकाची टॅक्‍सी घेतली. त्या टॅक्‍सीत हर्षकेश आणि मंगरूच्या कुटुंबातील 9 जण बसले. वर्मा कुटुंब टॅक्‍सीने वडाळ्याहून मुंबादेवीच्या दिशेला निघाले. 9.45 च्या सुमारास सुसाट टॅक्‍सीवरील मंगरूचे नियंत्रण सुटले. टॅक्‍सी दुभाजकाला धडकताच दोन महिला बाहेर फेकल्या गेल्या. दोघींचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. त्याच वेळी डोंगरीचे पोलिस निरीक्षक अंकुश काटकर हे मुक्त मार्गावर येत होते. पोलिसांनी टॅक्‍सीतील तीन जखमींना जे. जे. रुग्णालयात पाठवले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी जे. जे. रुग्णालयात गर्दी केली. मंगरू आणि रवीच्या चेहऱ्याला मार बसला आहे. विनयच्या हातालाही दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. रात्री उशिरा डोंगरी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident on eastern free way in mumbai