एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मृतांत कराड, मुंबईतील; तीन वर्षांच्या मुलीचा समावेश 

मृतांत कराड, मुंबईतील; तीन वर्षांच्या मुलीचा समावेश 
खालापूर : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाट उतरताना खालापूरनजीक गारमाळच्या वळणावर खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. 4) पहाटे हा अपघात झाला. मृत कराड आणि मुंबईतील रहिवासी होते. यात तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. इतर जखमींपैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

कराडहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या खासगी बसमध्ये 49 प्रवासी होते. लोणावळ्याच्या पुढे बोरघाट उतरताना गारमाळनजीक वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस वीस फूट खाली झाडांवर आदळत गेली. त्यामुळे बसमधील आसने निघून एकमेकांवर आदळली आणि गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस, देवदूत पथक, महामार्ग पोलिस पथक आणि अपघातग्रस्त मदतीसाठीचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमींना खोपोली नगरपालिका, कामोठेतील एमजीएम, पवना आणि लोकमान्य रुग्णालय; तळेगाव येथे दाखल करण्यात आले. 

...........

मृतांची नावे...
अपघातातात बसमधील सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (15, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (50, पवई) आणि प्रमिला रामचंद्र मोहिते (50, रा. कराड) यांचा जागीच मृत्यू झाला; तर जनार्दन रामचंद्र पाटील (45, रा. घाटकोपर) यांचा पवना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

.......

जखमींची नावे...
बाजीराव दादाराव पाटील (40), इंदू भास्कर जाधव (55), गणेश परमेश्‍वर मेनन (47), रेवा जिवेश हलदर (48), मारुती नामदेव जाधव (40), बद्रीनाथ पोपट गोसावी (29), बाजीराव रामचंद्र शेवाळे (50), सुनीता बाजीराव शेवाळे (40, दोघे रा. वाशी), रामचंद्र लक्ष्मण जाधव (59, रा. विक्रोळी), संजय शामराव पाटील (41, रा.वाशी), वंदना शांताराम शिंदे (35), ओमकार शांताराम शिंदे (15, दोघे रा. कराड), जयेश वसंत पाटील (38, रा. शिराळा), उज्ज्वला सुधीर निकम (19), आदित्य सुधीर निकम (11), दीपक शामराव यादव (43, रा. कांजूरमार्ग), सागर प्रताप घारे (27, रा. घणसोली), प्राजक्ता सचिन थोरात (23, रा. कराड), रमेश यशवंत देसाई (43, रा. कराड), प्रतिक पाटील (17) जय कुमार साळुंखे (13), ओमकार कुमार साळुंखे (वय 9), शकुंतला नथुराम तांबे (56, रा. कराड), संजय नथुराम गंभीरे (45, रा. कराड), जयश्री जनार्दन पाटील (घाटकोपर), अंकुश सीताराम मत्रे (25, रा. मुंबई), भास्कर बाबूराव जाधव (63, रा. कोपरखैरणे), सतपाल हनुमंतराव भगत (35) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपेकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

......... 

चालक दारूच्या नशेत 
या खासगी बससाठी दोन चालक होते. दोघेही दारू प्यायले होते, असे बसमधील अनेक प्रवाशांनी सांगितले. अशातच पहाटे डुलकी लागल्याने बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात घडला त्या परिसरात वळणावर रस्त्यालगत संरक्षक कठडा असता, तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती, असेही अनेकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on the expressway : 5 dead