खंडाळा घाटात अपघाताचे सत्र सुरूच

खोपोली : सोमवारी भयानक अपघात घडला, त्याच ठिकाणी मंगळवारी पुन्हा ट्रकचा अपघात झाला.
खोपोली : सोमवारी भयानक अपघात घडला, त्याच ठिकाणी मंगळवारी पुन्हा ट्रकचा अपघात झाला.

खोपोली (बातमीदार) : चुकीच्या मार्गाने व प्रतिबंध असलेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावरून प्रवासी बस आणल्याने गंभीर अपघात होऊन त्यात पाच जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची सोमवारची ताजी घटना असतानाच मंगळवारीही याच ठिकाणी ट्रक रस्त्यावरून खाली गेल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सोमवारी खालापूरचे तहसीलदार व पोलिस उपअधीक्षकांनी अपघातानंतर घटनास्थळाची पाहणी करून तीव्र उताराच्या रस्त्यावरून उलट दिशेने होणारी वाहतूक पूर्ण थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही मंगळवारी वाहनांची रहदारी सुरूच होती.

सोमवारच्या भयानक अपघाताच्या घटनेनंतर खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी घटनास्थळ आणि अपघातामागील कारणांची पाहणी केली. शॉर्टकट मारण्यासाठी प्रतिबंध असलेल्या दस्तुरी वळण रस्त्यावरून चालकाने प्रवासी बस नेली. त्यानंतर त्याचे तीव्र उतारामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला, असे पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्याची दखल घेत पुणे-मुंबई प्रवासासाठी तीव्र उताराच्या मार्गावरून जड वाहन व प्रवासी वाहनांची वाहतूक तत्काळ पूर्णपणे थांबवण्याचे आदेश महामार्ग पोलिसांना दिले होते. त्यानुसार सोमवारी वाहतूक पोलिसांनी कार्यवाही केली; मात्र मंगळवारी पुन्हा या रस्त्यावरून उलट दिशेने वाहतूक होत असल्याचे चित्र येरे माझ्या मागल्याप्रमाणे सुरू दिसले. 

विशेष म्हणजे, मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर आणि सोमवारी पाच बळी घेणारा अपघात घडला. त्याच ठिकाणी ट्रकचा तसाच अपघात घडला. यात ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याखाली गेला आणि दगडांवर आपटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याबाबत महामार्ग तैनात वाहतूक पोलिसांना विचारले असता, आम्ही उलट दिशेने येणारी वाहने रोखून परतवून लावत आहोत. तसेच, त्यांना नियमित मार्गाने जाण्यास सांगत आहोत. तरीही काही वाहनचालक मनमानी करून वाहने या मार्गावर आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com