किमॅनच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात 

किमॅनच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात 

पनवेल : पनवेल-दिवा रेल्वे मार्गावर कार्यरत असलेल्या किमॅनने प्रसंगावधान दाखवून रेल्वे रुळाला तडा गेल्याचा संदेश दिल्याने रोहा येथून दिवा येथे जाणाऱ्या पॅसेंजरच्या चालकाने वेळीच गाडी थांबवल्याने मोठा अपघात टळल्याची घटना गुरुवारी सकाळी तळोजा येथे घडली. विक्रम समाधान असे या किमॅनचे नाव असून त्याने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे रुळाची दुरुस्ती करून या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू केली. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील दिव्याच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा सुमारे पाऊण तास ठप्प होती. 

दिवा-पनवेल या रेल्वे मार्गावर कार्यरत असलेला विक्रम समाधान हा किमॅन गुरुवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास कळंबोली-तळोजादरम्यान नियमितप्रमाणे रेल्वे रुळांची तपासणी करत असताना त्याला एका ठिकाणी रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. या रुळावरून एखादी रेल्वेगाडी गेल्यास त्या रेल्वेगाडीला अपघात होण्याची शक्‍यता होती. 
त्याच सुमारास रेल्वे रुळावरून 80 ते 100 कि.मी. वेगाने रोहा-दिवा ही पॅसेंजर गाडी जाणार असल्याचे विक्रम समाधान यांच्या लक्षात आले. रोहा-दिवा पॅसेंजर 600 मीटरवर असताना समाधान यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ रेल्वेच्या नियमांप्रमाणे आपल्याजवळ असलेल्या डिटोनेटरच्या साह्याने स्फोट करून पॅसेंजरच्या मोटरमनला पुढे धोका असल्याचा संदेश दिला. त्यानंतर त्याने आपल्याजवळचा लाल झेंडा दाखवत गाडी थांबवण्याचा इशारा केला. 

पाऊण तासानंतर पॅसेंजर मार्गस्थ 
या वेळी दिवा-रोहा पॅसेंजरच्या मोटरमनला पुढे धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पॅसेंजरचा वेग कमी करून ती काही अंतरावर थांबवली; त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्यानंतर रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव धेऊन रुळाच्या दुरुस्तीने काम हाती घेतले. पाऊण तासानंतर रेल्वे रुळाची दुरुस्ती झाल्यानंतर पॅसेंजर मार्गस्थ झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली. या रेल्वे रुळाला तडा कशामुळे गेला याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com