मोटरमनकडून होणाऱ्या अपघातांना आळा बसणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबई - लोकल चालवणाऱ्या मोटारमनना प्रथमच सिम्युलेटर प्रशिक्षण देण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. विरार कारशेडमध्ये मोटरमनसाठी सिम्युलेटर केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे मोटरमनकडून होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. 

मुंबई - लोकल चालवणाऱ्या मोटारमनना प्रथमच सिम्युलेटर प्रशिक्षण देण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. विरार कारशेडमध्ये मोटरमनसाठी सिम्युलेटर केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे मोटरमनकडून होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. 

रेल्वेत सिम्युलेटरचे प्रशिक्षण याआधी पॅसेंजर गाड्यांच्या मोटरमनना दिले जात असे. आता ते लोकलच्या मोटरमनला देण्यात येणार आहे. यासाठी पश्‍चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारपर्यंतच्या रुळांचे व तेथील सिग्नल प्रणाली आदींचे प्रत्यक्ष चलत्‌चित्र घेतले आहे. धीम्या, जलद मार्गावर कुठे सिग्नल यंत्रणा आहे, लोकलचा मार्ग कुठे बदलायचा आहे. तसेच गाडीचा वेग कुठे किती देण्यात येतो, आदी बाबींचे प्रशिक्षण मोटरमनला देण्यात येणार आहे. 

नवीन मोटरमनसोबत लोकलमध्ये वरिष्ठ मोटरमनही असतात; मात्र ज्या वेळी वरिष्ठ मोटरमन नसतील तेव्हा या प्रणालीचा नवीन मोटरमनना फायदा होणार आहे. एखाद्या आपत्तीच्या वेळी मोटरमनची तातडीने गरज भासल्यास याचा मोटरमनना फायदा होईल. तसेच यामुळे मोटरमनकडून लोकलच्या अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रशिक्षणामुळे मोटरमनचे मनोबल उंचावण्यासदेखील मदत होणार आहे. 

प्रवास अधिक सुरक्षित 
या प्रशिक्षणात मोटरमन सिम्युलेटर प्रशिक्षण केंद्रात बसून लोकल चालवण्याचा अनुभव घेणार आहेत. त्यानंतर मोटरमन प्रत्यक्ष प्रशिक्षणाला जाईल. सिम्युलेटर प्रशिक्षणामुळे मोटरमनला लोकलच्या सिग्नल, रुळांची स्थिती आदींची माहिती असणार आहे. यामुळे प्रशिक्षणादरम्यान उपनगरीय रेल्वे यंत्रणा कमी वेळेत समजून घेणे मोटरमनना सोपे होईल. सिम्युलेटरच्या प्रशिक्षणामुळे मोटरमन अधिक सुरक्षितपणे लोकल चालवू शकतील. 

अनेक पदे रिक्‍त 
मध्य रेल्वेवर सद्यस्थितीत 690 मोटरमन कार्यरत आहे. प्रत्यक्षात मध्य रेल्वेवर 898 मोटरमनची पदे मंजूर करण्यात आली आहेत. 20 टक्के मोटरमनची पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पश्‍चिम रेल्वेवर अंदाजे 500 मोटरमन आहेत; तर सुमारे 150 मोटरमनच्या जागा रिक्त असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

Web Title: Accidents will be prevented by motorman