आयटीआयच्या पहिल्या यादीतील 80 हजार 206 विद्यार्थ्यांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

यंदा आयटीआय प्रवेशासाठी एक लाख 38 हजार 300 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी सरकारी आयटीआयमध्ये 89 हजार 616 आणि खासगी आयटीआयमध्ये 47 हजार 684 जागा आहेत. या जागांसाठी दोन लाख 58 हजार 628 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मुंबई : राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांची पहिली यादी बुधवारी (ता. 10) रात्री जाहीर झाली. पहिल्या फेरीत 80 हजार 206 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाला. या विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी 19 जुलैला जाहीर होईल. 

यंदा आयटीआय प्रवेशासाठी एक लाख 38 हजार 300 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी सरकारी आयटीआयमध्ये 89 हजार 616 आणि खासगी आयटीआयमध्ये 47 हजार 684 जागा आहेत. या जागांसाठी दोन लाख 58 हजार 628 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 40 हजार 799 विद्यार्थ्यांनी 'ट्रेड ऑप्शन्स' (व्यवसाय पर्याय) भरले. 

पहिल्या यादीत 80 हजार 206 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला. यामध्ये 67 हजार 212 जागा सरकारी आयटीआयमधील आणि 12 हजार 994 जागा खासगी आयटीआयमधील आहेत. 
संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निवडपत्र (अलॉटमेंट लेटर) त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश निश्‍चित झालेल्या विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

दुसरी यादी 19 जुलैला 
दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संस्थानिहाय पर्याय आणि प्राधान्यक्रम 12 ते 16 जुलै या कालावधीत भरावे लागतील. यामध्ये बदल केला नाही, तर विद्यार्थ्यांचे पहिल्या यादीतील पर्याय विचारात घेतले जातील. दुसरी यादी 19 जुलैला जाहीर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to the first list of ITI 80 thousand 206 students are admitted