esakal | ...फक्त आकडे फुगवू नका, विकासकामांचा हिशेब द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

...फक्त आकडे फुगवण्यापेक्षा विकासकामांचा हिशेब द्या!

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामे, योजना आणि प्रकल्पांची मंदावलेली गती पाहता प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ दिखाव्यापुरताच असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आला. आकडे फुगवण्यापेक्षा जनतेसाठी केलेल्या कामांचा हिशेब द्या, अशी मागणी युवक कॉंग्रेसतर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे.

...फक्त आकडे फुगवू नका, विकासकामांचा हिशेब द्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील विविध विकासकामे, योजना आणि प्रकल्पांची मंदावलेली गती पाहता प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ दिखाव्यापुरताच असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आला. आरंभीची एवढी शिलकी रक्कम असतानाही प्रशासनातर्फे आकडे फुगवण्याचे काम केले जात आहे. आकडे फुगवण्यापेक्षा जनतेसाठी केलेल्या कामांचा हिशेब द्या, अशी मागणी युवक कॉंग्रेसतर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे. प्रशासनाने हिशेब न दिल्यास लवकरच पालिकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

ही बातमी वाचली का? बीकेसीच्या धर्तीवर लवकरत केसीपी...

मागील अर्थसंकल्पातील 3 हजार 455 कोटी 63 लाख या प्रस्तावित रकमेत स्थायी समितीमार्फत 173 कोटी रुपये व सर्वसाधारण सभेद्वारे 139 कोटी रुपयांची भरघोस वाढ सत्ताधाऱ्यांमार्फत करून 4 हजार 20 कोटींवर अर्थसंकल्प नेऊन ठेवला होता; परंतु वास्तवात पालिकेचे प्रत्यक्ष उत्पन्न, विविध अनुदान आणि महसूल पाहता हा फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी, तसेच जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच लेखाशीर्षकातील आकडे फुगवले असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला. पालिकेची विविध रुग्णालये आजही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाहीत. आरोग्य विभागासाठी एकदम तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. परिवहन सेवा तोट्यात असून वेळेवर आणि अकार्यक्षम सेवा देण्यात येत आहे. परिवहन सेवा कालांतराने खाजगी कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा हा डाव नाही ना, असा प्रश्‍न युवक कॉंग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. शहरातील पार्किंगसाठीची व्यवस्था हा गंभीर विषय असतानाही त्यासाठी काहीही पावले उचलली गेली नाहीत. क्रीडासंबंधित संकुले उभारली नाहीत. पालिका शाळेत ई-लर्निंग कागदावरच आहे. विविध उड्डाणपूल-पादचारी पुलाचे कार्य मार्गी लागू शकले नाही, असे कित्येक विषय मागील आर्थिक वर्षात सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आलेले नाहीत. 

ही बातमी वाचली का? एसटीने जाणले प्रवाशांचे मोल

विकासकामांचा सत्ताधाऱ्यांनी हिशेब द्यावा, अन्यथा लवकरच पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे. 
- आनंद सिंह, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंगेस.