केईएममधील भृणप्रकरणी आता खात्यांतर्गत चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले 

मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात मांजराने भृणाचा काही भाग खाल्ल्याप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी केली. सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या आधारावर केलेल्या तपासणीत जैविक कचरा टाकण्याच्या कक्षात मांजराच्या हालचाली आढळल्या नाहीत, असे या समितीने स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाने आता खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नोव्हेंबरमध्ये केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बालकाचा होरपळल्याने मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच मांजराने भृण खाल्ल्याची घटना समोर आली. त्यामुळे केईएम रुग्णालयाच्या कारभारावर टीकेचा भडीमार झाला. महापालिकेला बदनाम करण्यासाठी समाजकंटकांनी प्रयत्न चालवल्याचा संशय केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केला होता. कचरा वाहून नेणारा कंत्राटदार दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने जैविक कचरा टाकण्याचा कक्ष आणि परिसरातील सीसी टीव्हींमधील चित्रीकरण तपासले. या चित्रीकरणात मांजराच्या हालचाली किंवा अन्य आक्षेपार्ह बाबी आढळल्या नाहीत, असे त्रिसदस्यीय समितीने प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला "क्‍लीन चिट' मिळाली असली, तरी खात्यांतर्गत चौकशी करणार असल्याचे आरोग्य खात्याचे उपायुक्त सुनील धामणे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित विभागांतील कर्मचारी-अधिकारी धास्तावले आहेत. 

जैविक कचऱ्याची वर्गवारी 
केईएम रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाच्या कोपऱ्यात गेट नंबर 7 जवळ जैविक कचरा कक्ष आहे. वेगवेगळ्या वॉर्डमधून येणाऱ्या जैविक कचऱ्याच्या पिशव्यांची नोंद केली जाते. वॉर्ड क्रमांक, पिवळी-लाल पिशवी, कॅन अशा प्रकारची नोंद होते. पिवळ्या पिशवीत निकामी झालेले अवयव, लाल पिशवीत हातमोजे, कॅनमध्ये सुया, इंजेक्‍शन्स अशी वर्गवारी केली जाते. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रुग्णालयातून दोन वेळा कचरा विल्हेवाटीसाठी आणला जातो. दोन फेऱ्यांमध्ये एकदा पिवळ्या आणि एकदा लाल पिशव्या व कॅन उचलले जातात. त्यानंतर कचरा वॉर्डमध्येच ठेवला जातो; तसेच हा कक्ष रविवारी पूर्ण दिवस बंद असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Account inquiry now for corruption in KEM