
Mumbai : अंमलीपदार्थ कायद्याअंतर्गत अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : कांजूरमार्ग पोलिसांनी अंमलीपदार्थ सेवनप्रकरणात अटक केलेल्या 19 वर्षीय आरोपीने टेलिफोनच्या वायरने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. अरबाज शेख असे आरोपी तरुणाचे नाव असून घटनेनंतर आरोपीला फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज शेख याला अंमलीपदार्थांसह अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे कमी प्रमाणात अंमलीपदार्थ सापडले होते. त्यामुळे अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली. सुरक्षेसाठी त्याला कैदेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी छतावरून भींतीवर गेलेली टेलिफोनची वायर त्याने तोडली व त्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार पोलिसांनी पाहिल्यानंतर त्याला तात्काळ फोर्टीज रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रक्रृती ठीक असून खबरदारी म्हणून त्याला 24 तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आरोपीने आत्महत्याचे प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेबाबत अधिक चौकशी सुरू आहे.