बलात्कारप्रकरणी आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने याच मुलीवर पूर्वीदेखील अत्याचार केला होता.

मुंबई ः  तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने याच मुलीवर पूर्वीदेखील अत्याचार केला होता.लग्नाचे प्रलोभन दाखवून २०१३ मध्ये आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याप्रकरणी अटक झाल्यानंतर सुटून आल्यावर आरोपीने चाकूच्या धाकावर गेल्या २५ ऑक्‍टोबरला पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या तावडीतून सुटून आल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली.

पंकज अहिरे (३६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो आरसीएफ कॉलनी परिसरात राहतो. पीडित तरुणी चेंबूर येथे राहणारी असून आरोपीच्या परिचयाची होती. २०१२ मध्ये त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर २०१३ मध्ये आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवून पीडित तरुणीवर बलात्कार केला. पण त्याने लग्न न केल्यामुळे अखेर तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. त्या प्रकरणी सुटून आल्यानंतर २०१९ मध्ये आरोपीने पुन्हा पीडित मुलीला रस्त्यात गाठले व तिचा मोबाईल हिसकावून घेऊन स्वतःच्या मोबाईलवर मिसकॉल देऊन तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. तरुणीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानंतर २५ ऑक्‍टोबरला आरोपीने तिला पुन्हा रस्त्यात गाठले व चाकूचा धाक दाखवून त्याच्या घरी नेले. तिथे चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी बाथरूममध्ये गेला असता तरुणीने तेथून पळ काढला व घर गाठले. अखेर पोलिसांकडे तक्रार केली असता त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested for rape