सात वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहतून फरार असणा-या आरोपीला  मुंब्रा परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी पॅरोलच्या सुट्‌टीवरून फरार झाला होता. अखेर 7 वर्षानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

संबधित आरोपी हा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातंर्गत फरार होता. रफिक अब्दुल रहमान शेख असे आरोपीचे नाव असून ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5 कडून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. 

आरोपी रफिक शेख हा मुंब्रा परिसरात रहात असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5 च्या पथकाने मुंब्रा येथे जाऊन रफिक याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी 2007 रोजी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

रफिकला या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. दरम्यान पॅरोलवर सुट्‌टीसाठी रफिक हा 23 जानेवारी 2012 रोजी बाहेर आला होता. त्यांनतर 14 दिवसांच्या रजेनंतर त्याने पुन्हा कारागृहात हजर होणे आवश्‍यक असताना देखील तो हजर झाला नाही.

दरम्यान तेव्हापासून आता पर्यंत असे एकूण सात वर्षे रफिक हा फरार होता. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांकडून त्याच्यावर पॅरोल जंप केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अखेर ठाणे पोलिसांनी रफिक याला पकडले असून त्याला रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused has been absconding for seven years finaly catched by thane police