न्यायालय आवारातून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दिनेश गोगी
रविवार, 15 जुलै 2018

उल्हासनगर : पोलिसाला खाली पाडून आणि त्याच्या हाताला झटका देवून उल्हासनगर न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या व गेल्या चार वर्षांपासून वेषांतराद्वारे पोलिसांना चकवा देत फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगर : पोलिसाला खाली पाडून आणि त्याच्या हाताला झटका देवून उल्हासनगर न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या व गेल्या चार वर्षांपासून वेषांतराद्वारे पोलिसांना चकवा देत फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली.

चार वर्षांपूर्वी अंबरनाथ मध्ये वास्तव्यास असलेल्या ज्ञानेश्वर जाधव याने उत्तरप्रदेशातून एका तरुणीचे अपहरण केले होते. याप्रकरणी तेथील मनकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ज्ञानेश्वरला पकडण्यासाठी पोलिसांनी अंबरनाथ गाठले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ज्ञानेश्वर याला जेरबंद करण्यात आल्यावर त्यास 9 सप्टेंबर 2014 रोजी ट्रांझिस्ट रिमांड मिळण्याकरिता उल्हासनगर न्यायालयात आणण्यात आले होते. तेंव्हा मनकापूर ठाण्याचे पोलीस उमेशकुमार यादव यांना खाली पाडून आणि हाताला झटका देवून ज्ञानेश्वरने न्यायालयाच्या आवारातून पलायन केले होते.

तेंव्हापासून फरार झालेल्या ज्ञानेश्वरने अंबरनाथ सोडून आणि वेषांतर करून पोलिसांना चकवा देणे सुरू ठेवले होते. मात्र हाच सातत्याच्या वेषांतराचा प्रकार ज्ञानेश्वरच्या अंगलट आला. एका खबऱ्याने फोन करून कळवले की चेंबूर म्हाडा कॉलनीत राहणारा एक इसम नेहमी वेषांतर करून बाहेर पडतो. आणि नेरुळ रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतो. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, तसेच उदय पालांडे, सुरेंद्र पवार, संजय माळी, आर.एल.जाधव, विवेक पदमेरे यांनी सापळा रचून ज्ञानेश्वर यास ताब्यात घेण्यात आले. त्याने उत्तरप्रदेशातून तरुणीचे अपहरण केल्याची आणि पोलिसाला जमिनीवर पाडून पलायन केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले. न्यायालयाकडून उत्तरप्रदेशचे पोलीस ज्ञानेश्वरला ताब्यात घेणार असल्याचे तरडे म्हणाले.

Web Title: The accused who fled the court yard were shocked