गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

महान गायिकेच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. किशोरीताई असाधारण गायिका होती. त्यांच्या जाण्यामुळे शास्त्रीय गायिकीची मोठी हानी झाली आहे. इश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 
- लता मंगेशकर, गानसम्राज्ञी

मुंबई - थोडे थोडके नव्हे, तर साडेपाच तप शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता दादर येथिल शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग', "सहेला रे...' सारख्या अनेत भावमधुर गीतांनी रसिकांच्या ह्दयाचा ठाव घेणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत 10 एप्रिल 1931 मध्ये झाला. त्या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या; मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.

सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या "गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. 

"जाईन विचारीत रानफुला' हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. 1987 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने; तर 2002 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले. शास्त्रीय संगीतात मोलाची कामगिरी बजावताना त्यांनी शिष्यांची फौज तयार केली. माणिक भिडे, नंदिनी बेडेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्त्वाची शिष्यगण. नात तेजश्री हिच्या विवाह समारंभात गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे अखेरचे दर्शन घडले होते. तेजश्री ही त्यांच्या गायिकाचा वारसा जपत आहे. 

त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते. घराण्याचे गाणे शिकत असताना त्यात किशोरी आमोणकर यांनी प्रयोगशीलता आणली. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. गाण्यामध्ये रस महत्त्वाचा असतो, असे त्या सांगायच्या. साहित्यशास्त्रात रससिद्धांत वापरला जातो. भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा वेध घेण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. हे तत्त्व आजच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड होती. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. 

पेटी, सतार, तबला या वाद्यांची साधनासुध्दा त्यांनी केली होती. तासन्‌तास रियाझच नव्हे तर रागांचा त्या मन लावून अभ्यास करायच्या. संगीताच्या मूळाशी जाऊन त्याचे विज्ञान समजून घेण्याचा त्यांचा हट्ट असे. त्यासाठी त्यांनी ग्रंशसंपदेतून स्वरांचा इतिहास शोधळा. हा त्यांच्या हट्ट संगीतविश्‍वाला श्रीमंत करुन गेला. 

किशोरीताईंनी देशविदेशात शेकडो मैफीली गाजवल्या. भारतातल्या सर्व संगीत महोत्सवात त्यांना आवर्जुन आमंत्रित केले जात असे. त्यांचे पती रविंद्र यांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. 

महान गायिकेच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. किशोरीताई असाधारण गायिका होती. त्यांच्या जाण्यामुळे शास्त्रीय गायिकीची मोठी हानी झाली आहे. इश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 
- लता मंगेशकर, गानसम्राज्ञी 

किशोरीताई या महान गायिका होत्या. त्यांनी आपल्या स्वरांनी संगीताला अजरामर केले. त्यांच्या जाण्याने संगीताचे नुकसान झाले आहे. 
- शंकर महादेवन, गायक 

Web Title: Ace Hindustani classical vocalist Kishori Amonkar passes away