पोलिसांनी उतरविली मद्यपींची "झिंग'! ठाणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत 623 मद्यपींवर कारवाई

राहुल क्षीरसागर
Friday, 1 January 2021

ठाण्यात पोलिसांनी मद्यपी वाहन चालक आणि सह प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम राबवून तब्बल 416 मद्यपींसह 207 सहप्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. 

ठाणे  : थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या जल्लोषावर राज्य सरकारने बंधने घातल्याने बहुतांश नागरिकांनी घरीच राहून जल्लोष केला. तरीही काही अतिउत्साहींना चाप लावण्यासाठी तसेच ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह टाळण्यासाठी शहरांतील चौकाचौकात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी (ता. 31) पोलिसांनी मद्यपी वाहन चालक आणि सह प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम राबवून तब्बल 416 मद्यपींसह 207 सहप्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. 

ठाणे पोलिस आयुक्तालयाअंतर्गत ठाणेनगर, कोपरी, नौपाडा, वागळे, कापूरबावडी, कासारवडवली, राबोडी, कळवा, मुंब्रा, भिवंडी,नारपोली, कोनगाव, कल्याण, डोंबिवली, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आदी पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. करोना आटोक्‍यात असला तरी नवा स्ट्रेन आढळून आल्याने राज्यातील महत्त्वाच्या पालिका हद्दीत 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाताळ आणि त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत असलेल्या सुट्या लक्षात घेऊन पोलिसांनी वाढते अपघात टाळण्यासाठी मद्यपी वाहनचालकांविरोधात 25 डिसेंबरपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

थर्टीफर्स्टनिमित्त मद्यापी वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपवन, कोलशेत तसेच शहरातील पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी सांयकाळपासून आणखी कडक नाकाबंदी सुरू करण्यात आली होती. ठाणे, कल्याण, बदलापूर,अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडीत आदी ठिकाणीही वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई करून 623 मद्यापी वाहन चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई केली. यामध्ये 416 वाहन चालक, 207 सहप्रवाशांचा समावेश आहे. दरम्यान, या कारवाईत सर्वाधिक दुचाकी वाहन चालकांचा समावेश आहे. 361 दुचाकी चालक, 29 तीन चाकी तर, 26 चार चाकी मद्यापी वाहन चालक या कारवाईत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठाण्यातील नारपोली पोलिस शाखेच्या हद्दीत सर्वाधिक 67 वाहनचालक आणि 40 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल कोनगाव, डोंबिवली, उल्हासनगर या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी मद्यपी वाहनचालक राबोडी, ठाणे नगर आणि कोपरी या विभागात आढळल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

पीपीई कीट घालून कारवाई 
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत वाहतूक पोलिसांनी गुरुवारी थर्टीफर्स्टनिमित्त मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईची मोहीम राबवली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने वाहतूक पोलिसांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी पीपीई कीट देण्यात आले होते. तसेच हे कीट परिधान करूनच मद्यपींची तपसणी करण्यात येत होती. त्यामुळे ठाणे शहर वाहतूक पोलिस आयुक्तालयामार्फत कर्मचाऱ्यांची देखील विशेष काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले.

Action against 623 alcoholics under Thane Police Commissionerate

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 623 alcoholics under Thane Police Commissionerate