मुजोर रिक्षाचालकांना हिसका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

ठाणे - स्थानक परिसरात जवळचे भाडे नाकारणाऱ्या, परवाना नसलेल्या आणि गणवेश परिधान न केलेल्या ४५ रिक्षाचालकांवर गुरुवारी (ता. ३) ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या रिक्षाचालकांकडून नऊ हजारांचा दंडही वसूल केल्याची माहिती ठाणेनगर वाहतूक पोलिस शाखेच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारण्याच्या अनेक तक्रारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी विशेष मोहीम राबवली. त्यानुसार ठाणेनगर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर, पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक सद्गीर यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात जाऊन रिक्षाचालकांवर कारवाई केली. रिक्षाचालकांना हे पोलिस कर्मचारी नौपाडा, कोर्ट नाका असे जवळचे भाडे सांगत असे. त्यानंतर जो रिक्षाचालक हे भाडे नाकारत असे, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी गणवेश आणि परवाना जवळ न बाळगणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई झाली. 

रिक्षाचालकांचे धाबे दणाणले
भाडे नाकारणाऱ्या २० रिक्षाचालक तर विनापरवाना रिक्षा चालविणे, गणवेश परिधान न केलेल्या २५ रिक्षाचालकांवर या वेळी कारवाई करण्यात आली. या रिक्षाचालकांकडून पोलिसांनी नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.

वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी विशेष मोहीम राबवली आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत आम्ही साध्या वेशात जाऊन रिक्षाचालकांवर कारवाई केली. रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
- हेमलता शेरेकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Action on auto rickshaw driver