Mumbai : मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणीसाठी समिती - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action Committee for Inspection of Girls Hostels Chandrakant Pati ajit pawar

Mumbai : मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणीसाठी समिती - चंद्रकांत पाटील

मुंबई : मरीन ड्राईव्ह परिसरात शासकीय वसतिगृहात झालेल्या विद्यार्थिनी हत्येची चौकशी करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील सर्व वसतिगृहात विद्यार्थिनी सुरक्षित आहेत काय, याचा अहवाल १५ दिवसांत मागविला आहे. मुंबईत झालेल्या या हत्येबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार अत्यंत आक्रमक झाल्यानंतर आज शासनाने चौकशीचे आदेश जारी केले.

या वसतिगृहातील सुरक्षारक्षकानेच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली, असा अंदाज असून या रक्षकाचा मृतदेह रेल्वेमार्गावर आढळला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तीन तपास पथकांद्वारे गुन्ह्याचा शोध सुरु केला आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या या वसतिगृहात नेमके काय झाले याचा अहवाल निपुण विनायक यांची एकसदस्यीय समिती तातडीने सादर करणार आहे. विद्यार्थिनीच्या हत्येचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.

शासन या घटनेकडे गंभीरपणे पाहात असून उच्च शिक्षण सचिव आणि तंत्र शिक्षण सचिवांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती राज्यातील वसतिगृहांची पाहणी करणार आहे. अमरावती विभागाच्या शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, मुंबई विभागाचे उपसंचालक केशव तुपे आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयातील डॉ.सोनाली रोडे या पाच सदस्यीय समितीचे सदस्य असतील.१५ जून पर्यंत ही समिती अहवाल सादर करेल.

अजित पवार पोलिस स्थानकात

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी सरळ मरिन लाइन्स पोलिस स्थानक गाठले. मुंबईत ज्या रस्त्यावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च अधिकारी प्रवास करतात, त्या रस्त्यावरील वसतिगृहात अशी घटना घडणे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासमवेत आमदार अमोल मिटकरीही होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी हेच का सरकारचे बेटी पढाव अभियान अशा शब्दांत टीका केली आहे.