थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा! 

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा! 

नवी मुंबई - मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांच्या मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. शहरातील 23 जणांच्या मालमत्तांवर कारवाई झाली असून, उर्वरित 830 थकबाकीदारांना 48 तासांत थकबाकी चुकती करण्याची नोटीस बजावली आहे. मालमत्ता कर विभागाच्या धडक कारवाईमुळे सर्व थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. 

अनेक वर्षांपासून मालमत्ता विभागाच्या संगणकांत तयार करून ठेवलेली मालमत्ता कराची देयके काही दिवसांपासूनच संबंधित विभागाने पाठवण्यास सुरुवात केली होती. सर्व देयके वाटण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर अचानक हाती आलेली मालमत्ता कराची आकडेवारी सर्वांनाच धडकी भरवणारी होती. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी संबंधित विभागांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने बजावलेली बिले भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्यानंतरही कर भरला जात नसल्याचे मालमत्ता विभागाच्या लक्षात आले. त्यानुसार आठ हजार 800 थकबाकीदारांची यादी मालमत्ता कर विभागाने तयार केली. त्यातील 830 ग्राहकांना कर भरण्यासाठी 31 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत दिली होती. मंगळवारी दिवसभर मालमत्ता कर विभागातील अधिकाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर थकवणाऱ्या 23 जणांच्या मालमत्तेला सील ठोकले. बेलापूर, नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे, रबाळे, घणसोली, ऐरोली व दिघा येथे मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. कारवाई झालेले बहुतांश मालमत्ताधारक औद्योगिक परिसरातील असून, काही कॉर्पोरेट कार्यालयांचाही यात समावेश आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा हा पहिला टप्पा असून, पुढच्या टप्प्यात आपल्यावर कारवाई ओढवू नये यासाठी मालमत्ता कराचा भरणा करा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

"सकाळ'ने उघड केला मालमत्ता कराचा घोटाळा 
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील हजार कोटींचा घोटाळा "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली होती. मालमत्ता कर विभागात घोटाळा कसा काय, असा प्रश्‍न सर्वच लोकप्रतिनिधींना पडला होता. त्यावरून अनेक वेळा मालमत्ता कर विभागावर आगपाखडही झाली होती. परंतु, खोळंबलेल्या मालमत्ता कराचा लेखाजोखा बाहेर आल्यानंतर आता थकबाकीदारांच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com