सदानंद बाबा आश्रमाची चार मजली धर्मशाळा जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

वसई तालुक्‍यात तणावपूर्ण स्थिती; जिल्ह्यात जमावबंदी

नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर येथील बालयोगी सदानंद महाराजांच्या आश्रमातील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी वन विभागाकडून प्रचंड पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरु आहे. या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २९) आश्रम परिसरातील ४ मजली धर्मशाळा जमीनदोस्त करण्यात आली.

ही कारवाई ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकाम भुईसपाट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या कारवाईमुळे भक्त रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण वसई तालुक्‍यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

तुंगारेश्वरच्या अभयारण्यातील बालयोगी सदानंद बाबा यांचा आश्रम पूर्णपणे अनधिकृत असून त्यामुळे तेथील पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ३१ ऑगस्टपर्यंत आश्रमातील संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मंगळवार (ता. २७)पासून वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ७ जिल्ह्यांतील पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. बुधवारी (ता.२८) साडेचार वाजेपासून जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यास सुरुवात करून गोशाळा आणि भक्तांचे निवासस्थान पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले. गुरुवारी आश्रमाच्या समोरच उभी असलेली ४ मजली धर्मशाळा जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. या कारवाईपूर्वी धर्मशाळेतील भक्तांना बाहेर काढले आले.

आज पुनर्विचार याचिकेवर सुनावणी
सदानंद महाराजांच्या आश्रमावर सुरू असलेल्या कारवाईचा पुनर्विचार व्हावा यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. या वेळी महाराष्ट्र सरकारचे वकील, आश्रमाचे वकील आणि पर्यावरणवादी यांचे वकील; तसेच राम नाईक यांनीही पुनर्सुनावणी व्हावी अशी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत यावर सुनावणी होईल असे सांगितले. त्यामुळे आश्रमाचे वकील गोपाल बलवंत साठे यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना पत्र लिहून उद्या दोन वाजेपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंतीही केली आहे. मात्र वन विभागाकडून ही कारवाई सुरूच आहे.

भक्तांकडून लढ्यासाठी समाजमाध्यमांचा वापर
मंगळवारपासून सुरू झालेल्या कारवाईबाबत संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. याबाबत कोणीही अधिकृत माहिती देत नसून आश्रम परिसरात पत्रकारांनाही प्रवेश बंद केला असल्यामुळे डोंगरावर सुरू असलेल्या कारवाईबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे भक्तांकडून समाजमाध्यमावर विविध संदेश व्हायरल करून वातावरण तापवण्याचा प्रकार सुरू आहे.

कारवाईविरोधात भक्तांचा रास्ता रोको
बाबांच्या आश्रमावर सुरू असलेल्या कारवाईविरोधात गुरुवारी सायंकाळपासूनच भक्तांचा उद्रेक सुरू झाला आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून सदानंद बाबांच्या भक्तांनी विरार पश्‍चिम ग्लोबल सिटी, पूर्वेकडील साईबाबा मंदिर, नारंगी बायपास रस्ता, वसईतील कामण, चिंचोटी या परिसरात मानवी साखळी व रस्त्यात बांबू टाकून रास्ता रोको केला. बुधवारी सकाळी वालीव गाव बंद ठेवून संपूर्ण बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती. यामुळे संपूर्ण वसई तालुक्‍यात तणावपूर्ण वातावरण आहे. संपूर्ण जिल्ह्यात १४४ हे जमावबंदी कलमही लागू करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारीही तळ ठोकून
या कारवाईसाठी कोकण विभागातील ७ जिल्ह्यांमधील ४ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, महसूलचे अधिकारी व कर्मचारी, वन्यजीव संरक्षक विभागाचे अधिकारी व कर्मचारी असा ५ हजारांहून जास्त फौजफाटा सक्रिय आहे. यासाठी स्वत: कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक, पालघरचे जिल्हाधिकारी, पालघर पोलिस अधीक्षक, ७ जिल्ह्यांचे अपर पोलिस अधीक्षक या परिसरात तळ ठोकून आहेत.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर बजरंग दलाचा रास्ता रोको
तुंगारेश्‍वर येथील सदानंद महाराजांच्या आश्रमावर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी संध्याकाळी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाडा खडकोनाजवळ रास्तारोको केला. पोलिसांनी बजरंग दलाच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली. बजरंग दलाने सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू होते. पोलिस अधीक्षक गौरव सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाहेर हटवले. रास्तारोकोमुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on Dharamshala of Sadanand Baba Ashram

टॅग्स