मराठी क्रमांकाच्या वाहनांवरील कारवाई बेकायदा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

राज्य सरकारचे आदेशच नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट; दंडही आकारता येत नाही

मुंबई ः महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमानुसार मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सरकारचे आदेशच नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या १४ महिन्यांत सुमारे ६६७ दुचाकी वाहनांवर कारवाई करत १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात मराठी नंबर असलेल्या किती चारचाकी वाहनांवर कारवाई केली याचा तपशील मात्र वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही. 

हौसेपोटी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दादा, नाना, आबा, राज अशा फॅन्सी मराठी नंबर प्लेट लावल्या जातात. परंतु, मुंबई वाहतूक पोलिसांकडून अशा मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांकडून दंड वसूल करताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’तर्फे गोवर्धन देशमुख यांनी माहिती अधिकारात वाहतूक विभागाकडे मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे राज्य सरकराचा आदेश असलेली प्रत मागवली होती. त्यावर याबाबतचा आदेश नसल्याचे उत्तर त्यांना सरकारने पाठवले आहे. 

राज्यातील मराठी क्रमांकाच्या वाहनांवर केंद्र सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई चुकीची असल्याचे मत गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. १९८८-८९ मध्ये जो कायदा बनवण्यात आला, त्यातील कलम ५० चा हवाला वाहतूक पोलिस देत आहेत; मात्र यात दंडाची रक्कम नमूद नाही. मग कोणत्या तरतुदीनुसार पोलिस २०० रुपये आकारतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकार जोपर्यंत मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश देत नाही तोपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटनेने केली आहे. मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर सातत्याने होणाऱ्या कारवाईला आळा घातला पाहिजे, तसे पत्र संघटनेमार्फत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले आहे; शिवाय राज्यात वाहनांवर मराठी क्रमांक टाकण्यास अधिकृत परवानगी सरकारने द्यावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action on marathi number plates is illegel