निराधार महिलेच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून चिंगीबाई हिला चार फूट उंचीचा लोखंडी स्टॉल दिला होता. यावर कारवाई करू नये, असे फलकही लावले होते. विनानोटीस स्टॉलवर पालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. याविरोधात पालिकेच्या एफ उत्तर कार्यालयावर मोर्चा काढू.

- शांताराम कारंडे, सरचिटणीस, मनसे 

वडाळा - गटई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या चिंगुबाई विलास भोसले या निराधार महिलेचा आर. ए. किडवाई मार्गावरील स्टॉल पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून शनिवारी कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात आला. या कारवाईने या महिलेवर उपासमारीची वेळ आली असून, भरउन्हात बसून तिला गटईचे काम करावे लागत आहे.

४० वर्षांपूर्वी निवृत्ती रामचंद्र भोसले यांनी वडाळा पश्‍चिम स्थानकांसमोरील हिरा महल पदपथावर गटई व्यवसाय सुरू केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा विलास निवृत्ती भोसले (वय ३७) याने व्यवसाय सुरू ठेवला. या वर्षी जानेवारीमध्ये विलासचे यकृताच्या आजाराने निधन झाले. अचानक कुटुंबाचा आधार हरपल्याने विलासची पत्नी चिंगुबाई हिने चार मुलींचे पालनपोषण करण्यासाठी वडिलोपार्जित व्यवसाय सुरू केला. घर चालवण्याची कसरत करत असलेल्या चिंगीबाई यांच्यावर शनिवारी पालिकेच्या रूपात डोंगर कोसळला. पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता तिच्या स्टॉलवर शनिवारी कारवाई केली. याबाबत तिने पालिका कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, तुमच्या स्टॉलसमोरील सुपर हेअर ड्रेसर्स सलून आणि राशी नवरत्नच्या दुकानमालक डॉ. अरविंद कटके यांनी तुमच्या स्टॉलची तक्रार केल्याचे सांगण्यात आले. याबाबत डॉ. अरविंद कटके यांच्याशी संपर्क साधला असता, या विषयावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देऊ शकत नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली.

Web Title: Action on the stall of the unfinished woman

टॅग्स