नालेसफाईत दिरंगाई केल्यास कारवाई  

नालेसफाईत दिरंगाई केल्यास कारवाई  

मुंबई - नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबई पालिका नोटीस बजावणार आहे. ४० टक्के कामही पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

निवडणूक आचारसंहितेचे कारण देत नालेसफाईची कामे करण्यात कंत्राटदारांनी दिरंगाई केल्याचे आढळले आहे. मे महिन्यापूर्वी मुंबईतील ७० टक्के नालेसफाईची कामे करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी ४० टक्केही नालेसफाई झालेली नाही. राजकीय पक्षांनी केलेल्या पाहणीतही अनेक मोठे नाले गाळातच असल्याचे निदर्शनास आले आहे. सत्ताधारी शिवसेनाही या कामाबाबत समाधानी नसल्याचे त्यांच्या काही नेत्यांनी स्थायी समितीत बोलून दाखवले. या पार्श्‍वभूमीवर धीम्या गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावली जाणार आहे. तर ४० टक्केही काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

धीम्या गतीने काम करणाऱ्या सहा कंत्राटदारांची यादीही प्रशासनाने तयार केली आहे. या यादीत अजूनही काही कंत्राटदारांची नावे वाढण्याची शक्‍यता आहे.

नालेसफाईचा अहवाल आज
सर्व नगरसेवकांनी याचा जाब प्रशासनाला विचारला होता. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उद्या सोमवारी (ता. १३) स्थायी समितीत कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालावरून नालेसफाईचा स्थायी समितीत पंचनामा होणार आहे. 

 ३५ ते ४० टक्केच सफाई
नालेसफाईच्या कामांचे कोट्यवधीचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर होऊन कामे महिनाभरापूर्वी सुरू होऊनही नाले अद्याप समाधानकारक साफ न झाल्याने त्यावरून आरोप होऊ लागले आहेत. अजूनही काही ठिकाणी ३५ ते ४० टक्केच नालेसफाई झाली आहे. ही कामे जर पावसाळ्यापूर्वी झाली नाहीत, तर मुंबईची तुंबई होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी डेब्रिज, गाळ नाल्यांच्या बाजूला पडून आहे. गझदरबंध येथे डेब्रिज तसेच आहे. तर, काही ठिकाणी प्लास्टिक, बांधकामाचे साहित्यही पडून आहे. बीकेसीमध्ये मॅन्ग्रोज नाल्यांमध्ये आलेत. गाळ काढणारा रोबोही कुठे दिसत नाहीत. चमडावाला नाल्याचीही सफाई झालेली नाही. याचे पडसाद आठवडाभरापूर्वी पालिकेच्या स्थायी समितीत उमटले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com