
Mumbai : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पोलीस अलर्ट
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत.
या निर्णयानंतर दापोली पुण्यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या दोन गटातील समर्थकांमध्ये जोरदारा राडा झाला.
या परिस्थीत मुंबई पोलिस सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत. राज्यात इतर ठिकाणी झालेले प्रसंग मुंबईत होऊ नये यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क रहिण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलीस अलर्ट
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मुंबईतील पोलीस ठाण्यांना अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात इतर ठिकाणी ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलीस प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिक मोठ्या संख्येने नाराज आहेत .
तसेच या निर्णयानंतर मुंबई सुद्धा शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी अशा परिस्थितीत शांतता नांदावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरातील शिवसेना 'शाखा'वर विशेष सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेषतः शिवसेना शाखांवर पोलीस गस्त वाढवण्याचे आदेश दिली आहेत . तसेच मुंबई पोलिसांनी कायद्याच्या तरतुदींनुसार शहरात पाचहून अधिक व्यक्तींच्या बेकायदेशीर एकत्र येण्यावर बंदी घातली आहे
पुण्यात आमने सामने
पुण्यात नवी पेठ येथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही गट आले होते. मुख्यमंत्री पुण्यात असताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला.
दापोली येथे आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर दापोलीत तणावाचे वातावरण तयार झाले आहे. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट आणि समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असे म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबादी करत राडा केला.