मुंबईत 1 कोटी लस साठवणूक होणार, साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर

मुंबईत 1 कोटी लस साठवणूक होणार, साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर

मुंबई: मुंबईत एकावेळी 1 कोटी लस डोस ठेऊ शकतील एवढ्या क्षमतेची लस साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत कमी वेळेत अधिक लसीकरण करावयाचे असल्याने आठवडयाभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एवढ्या मोठी लस साठवणूक क्षमता असणारे मुंबई पहिले शहर ठरणार आहे. 

केंद्र सरकारच्या ड्रॅग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हँक्सी लसीच्या वापराला परवानगी नुकतीच दिली. त्यामुळे लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात कधी ही होऊ शकते. याची जय्यत तयारी महापालिकेने केली असून सध्या 10 लाख डोस ठेवण्याची व्यवस्था लस साठवणूक केंद्रात करण्यात आली आहे.

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात 5 ते 6 लाख फ्रंटलाईन कर्मचारी, कामगारांचे लसीकरण करण्यात येणार आहे. महानगर पालिकेने आठ रुग्णालयात लसीकरण केंद्र तयार केले असून कांजूरमार्ग येथे लस साठवणूक केंद्र तयार केले आहे. रोज 12 हजार जणांना लस देता येईल यासाठी 2245 कर्मचाऱ्यांचे 500 पथकं तयार केली आहेत.

आरोग्य तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण आठवड्याभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील 50 लाख नागरिकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासकीय इमारती आणि शाळांमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहेत.

लस उपलब्ध झाल्यानंतर सर्व लोकांचे लसीकरण करण्याची शिफारस राज्य टास्क फोर्सने केली आहे. मुंबईत साधारणता दीड कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे. महिन्याभरात साधारणता 50 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा आराखडा पालिका तयार करत आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे 50 लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका शाळा आणि प्रशासकीय इमारतींमध्ये लसीकरण केंद्र तसेच आवश्यक तेथे स्वतंत्र लसीकरण केंद्र युद्धपातळीवर तयार करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

कूपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, शीव रुग्णालय, केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय येथे कोरोना लस साठवणूक केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यासह एस विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून तयार करण्यात  आली असून अशा  प्रकारची आणखी चार केंद्र नव्याने तयार करण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील सायन रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

Additional Commissioner Suresh Kakani informed one crore vaccines stored Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com