अधिक मासात जावयांना धोंड्याचे आमंत्रण

शर्मिला वाळुंज
बुधवार, 16 मे 2018

ठाणे - अधिक मासात जावयाला वाण देण्याची प्रथा असते; याला धोंडा असेही म्हणतात. बुधवारपासून (ता. १६) अधिक ज्येष्ठ मासास प्रारंभ होत असून जावयांसाठी हा सुगीचा महिना ठरतो. विशेषतः नवविवाहितांसाठी सासूरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू होते. कुठल्याही गोष्टीचे मार्केटिंग करण्याच्या अलीकडच्या जमान्यात अधिक मासाचंही मार्केटिंग छान होऊ लागलं आहे. त्यात साहजिकच सुवर्णपेढ्या आणि मिठाई व्यापारी आघाडीवर आहेत. आकर्षक सजावटीमध्ये दुकानात अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक यांची पाकिटे तयार करून व्यापाऱ्यांनी ठेवली आहेत; तर सुवर्णपेढ्यांनीही जावयांना खूश करण्यासाठी आकर्षक चांदीचे दिवे, तबके आणली आहेत.

उद्यापासून अधिक महिना सुरू होत असून सर्वत्र जावयाच्या वाणाची आणि धोंड्याच्या जेवणाची चर्चा सुरू झाली आहे. जावयांना धोंड्याचे आमंत्रण दिले जाऊ लागले आहे. पहिल्या अधिक मासाला चांदीचे तबक देण्याची प्रथा आहे. या तबकात ३३ अनारसे ठेवून त्यामध्ये दीप प्रज्वलित करून जावयाला वाण दिले जाते. अनारशांऐवजी बत्तासे किंवा म्हैसूरपाक अशा सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याचीही पद्धत आहे. अनारसे हल्ली घरोघरी बनवले जात नसल्याने तयार अनारसे खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. या अनारशांची ऑर्डर यायला सुरुवात झाली असल्याचे विक्रेते श्रीराम बोरसे यांनी सांगितले.

धोंड्याच्या मासाचेही मार्केटिंग आता होऊ लागले असून अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक आदी पदार्थ आकर्षक सजावटीमध्ये पॅकिंग केलेले दुकानांत दिसू लागले आहेत. चॉकलेट ठेवूनही हे पदार्थ सजवले आहेत. बाजारात अनारसे १०० ते जास्तीत जास्त ३५० रुपये किलोपर्यंत मिळत आहेत; तर म्हैसूर पाक हा २४० रुपये किलोने मिळत आहे. बत्ताशाचे पाकीट हे ३० ते ४० रुपयांना आहे. यासोबतच जावईबापूंना कपडे, दागिने, भांडीस्वरूपात वस्तू भेट दिल्या जातात. या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. सुवर्णपेढ्यांमध्ये चांदीचे तबक, चांदीचे दिवे, लक्ष्मीनारायण देवांची मूर्ती आदी वस्तू भेट म्हणून नागरिक खरेदी करत असल्याचे सराफ धीरज खेमाणी यांनी सांगितले.

शुभेच्छा अन्‌ जेवणाचा आग्रह
अधिक महिन्याचेही मार्केटिंग होऊ लागले असून सोशल मीडियावर जावयांना धोंड्याच्या महिन्याच्या शुभेच्छा व आमंत्रण दिले जात आहे. धोंड्याच्या जेवणाचा आग्रह जावयांना सर्व ज्येष्ठ करीत आहेत. अधिकमासाच्या या पंगतीत धोंड्याला महत्त्व असून पुरण घालून केलेल्या चौकोनी पदार्थाला दिंड म्हणतात; तर त्याला गोल आकार दिला की धोंडा म्हणतात. हा धोंडा वाफेवर उकडला जातो आणि गरम-गरम वाढला जातो. वाढल्यानंतर तो मधोमध फोडून त्यात साजूक तूप घालून खायला दिला जातो.

बुधवारपासून अधिक ज्येष्ठ मासास प्रारंभ होत आहे. अधिक मासास पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्या महिना असेही म्हणतात. दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी २७ महिने आणि जास्तीत जास्त ३५ महिने अंतर असते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन यापैकी कोणताही महिना अधिक मास होऊ शकतो. गरीब, गरजू लोकांना मदत मिळावी, यासाठी अधिक मासामध्ये दान देण्यास सांगितले आहे. ३३ अनारसे, दीप यांचे दान दिले जाते. आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, ग्रंथदान करणेही जास्त योग्य आहे. 
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते

Web Title: adhik mas dhonda invitation