आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा; कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी भाजप नेत्याची मागणी

तुषार सोनवणे
Wednesday, 16 December 2020

कांजूरमार्गप्रकरणी भाजपनेत्यांनी ठाकरे सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे

मुंबई - कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेड प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे.  यावरून भाजपनेत्यांनी ठाकरे सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे

पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, आमच्याकडे सविस्तर निकालपत्र यायचे बाकी आहे. ही जागा मेट्रो कारशेडसाठी अत्यंत महत्वाची असून, त्यामुळे राज्य सरकारचे 5 हजार 500 कोटींची बचत होणार आहे.' अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर किरीट सोमाय्या यांनी जोरदार  टीका केली आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत, अशी जहरी टीका किरीट सोमाय्या यांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सोमाय्या यांनी केली आहे.

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली 

कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज एमएमआरडीएला दिले असून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मेट्रो कारशेड प्रकल्पाला तूर्तास खीळ बसला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही कांजूरमार्ग कारशेड चा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले होते. आज न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ' राज्य सरकारने एमएमआरडीएला कांजूरमार्गची जागा देण्याच निर्णय चुकीचा आहे. सरकारने तयार केलेल्या सौनिक समितीच्या अहवालातही नमूद करण्यात आले होते की,  फक्त अहंकारामुळे एमएमआरडीएला जागा देण्याचा आदेश काढण्यात आला. संबधित जागा कालही विवादात होती, आजही आहे. आता तर खुद उच्च न्यायालयाने तेथील काम थांबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढे या ठिकाणी काम होऊ शकत नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray is childish he should resign Demand of BJP leader kirit somaiyya in Kanjurmarg car shed case