विनोद तावडेंवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा: आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पंतप्रधानांना भेटणार 
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या प्रश्‍नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. पंतप्रधानांकडे या भेटीसाठी वेळ मागितली आहे, असेही ते म्हणाले. 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 18) येथे केली. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा. मुंबई विद्यापीठावर प्रशासक नेमून उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी आदित्य यांनी केली. निकालाची मुदत चुकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही हक्कभंग का आणू नये, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

निकाल दिरंगाईबाबत शुक्रवारी (ता. 18) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे शिक्षणमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्याबाबत आदित्य म्हणाले, "ही बैठक यापूर्वीच व्हायला हवी होती; पण शिक्षणमंत्र्यांना आताच वेळ मिळाला. ऑनस्क्रीन असाईनमेंटचे कंत्राट दिलेली मेरिट रॅंक ही कंपनी कोणाची आहे? त्याचे संचालक कोण आहेत? त्यांना कंत्राट मिळाले कसे? याची माहिती पारदर्शकरीत्या उजेडात आली पाहिजे, असेही आदित्य म्हणाले. 

विद्यार्थ्यांची गुणपत्रिका येत नाही तोपर्यंत विद्यापीठाने जाहीर केलेला निकाल निरुपयोगी आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तीन लाख पेपर गहाळ झाले आहेत. त्यांचे काय होणार, असे प्रश्‍न आदित्य यांनी विचारले. 

शिक्षणमंत्र्यांवर अधिवेशनात हक्कभंग आणल्यावर 5 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते; पण निकाल सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता कमी आहे. मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणायचा का? निकालाला विलंब करणे हा मुख्यमंत्र्यांविरोधातील कटही असू शकतो, अशी टिप्पणीही आदित्य यांनी केली. 

पंतप्रधानांना भेटणार 
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या प्रश्‍नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. पंतप्रधानांकडे या भेटीसाठी वेळ मागितली आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Aditya Thackeray criticize Vinod Tawade on Mumbai University issue