निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

५७६ मतदान केंद्रांपैकी १० केंद्रे संवेदनशील; ६५० ईव्हीएम मशीनचा वापर

पनवेल : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या अनुषंगाने ता. २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्‍या २१ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. पनवेल मतदार संघ हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मतदार संघ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील पोलिस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

निवडणुकांच्या काळात कामकाज कसे असेल याची माहिती देण्यासाठी पनवेलमधील कळसेकर कॉलेजमध्ये सोमवारी (ता. २३) राजकीय प्रतिनिधी, पोलिस अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले व पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी मार्गदर्शन केले; तर सहायक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे व तहसीलदार अमित सानप यांची उपस्थिती लाभली.

पनवेल मतदारसंघात एकूण मतदार ५,५४,४६४ आहेत. यामध्ये पुरुष मतदार २,९७,२७२; तर स्त्री मतदारांची संख्या २,५७,३७४ आहे. एकूण मतदान केंद्रे ५७६ आहेत. यामध्ये दिव्यांग व वृद्धांना त्रास होऊ नये याकरिता तळमजल्यावर ५२० मतदान केंद्रे असणार आहेत, पहिल्या मजल्यावर ५४ केंद्रे; तर दुसऱ्या मजल्यावर दोन केंद्रे असणार आहेत. संवेदनशीलतेचा विचार करता ५७६ पैकी १० मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. सर्वांत जास्त मतदार असलेले केंद्र १५७ खारघर आहे. या ठिकाणी एकूण १७५२ मतदार आहेत; तर सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र खैरवाडी १६३ आहेत. या ठिकाणी एकूण ३०५ मतदार आहेत.या वेळी आयोजित बैठकीत उमेदवाराने नामनिर्देशपत्र सादर करताना तसेच आदर्श आचारसंहिता काळात कोणती काळजी घ्यावयाची याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली; तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कशा प्रकारे पोलिस बंदोबस्त असेल याची माहिती पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. निवडणुकीदरम्यान रोख रकमेचे वाटप, मतदारांना प्रलोभन किंवा दडपण आणल्यास गुन्हा दाखल होऊ शकणार आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्‍त 
आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने एकूण चार भरारी पथके, चार स्थिर सर्वेक्षण पथके, चार छायाचित्र देखरेख पथके; तर एक छायाचित्र पाहणी पथक नियुक्त करण्यात आले आहे.  पनवेल विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी अंदाजे ६५० ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन्स वापरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration ready for election