आंबेडकरी अनुयायांच्‍या मदतीसाठी प्रशासन सज्‍ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व्यवस्था केली आहे. जादा बससेवेप्रमाणे वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व्यवस्था केली आहे. जादा बससेवेप्रमाणे वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

अनुयायांना डॉ. आंबेडकर यांची पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’, ‘बहिष्कृत भारत’ आदी पुस्तकांचे वाटप करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने एक लाख रुपयांची तरतूद केली आहे. बेस्ट उपक्रमातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजगृह’ हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे २९२ अतिरिक्त पथदिवे बसवण्यात आले आहेत.

महापालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या मंडपांना तात्पुरती वीजजोडणी धर्मादाय वीजदराने पुरवण्यासाठी मैदानात ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे.

चैत्यभूमीवर मोफत भोजनवाटप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येतात. बहुजन संग्राम संघटना आणि डॉ. माईसाहेब आंबेडकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सुमारे ५००० अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. शुक्रवारी (ता. ६) दुपारी १ वाजता भोजन वाटप सुरू होईल.  बोया वेळी मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration ready to help Ambedkar followers