530 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नदी काठावरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्‍यात चारही नद्यांना पूर आला होता. पुरात अडकलेल्या 530 पेक्षा अधिक लोकांना वाचविण्यात यश आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

भातसा, काळू, बारवी आणि उल्हास या नदीच्या काठावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील सर्वाधिक फटका म्हारळ, कांबा, वरप, आणे रायते आपटी, पावशेपाडा आदी गावांना बसला. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याखाली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

पुरामुळे म्हारळ आणि वरप गावाला मोठा फटका बसला, तो येथील बांधकामांमुळे. म्हारळ येथे थारवानी व इतरांनी पाण्याच्या प्रवाहात बांधकाम केले आहे; तर वरप येथे साईबाबा नगरच्या मागील बाजूने पत्र्याचे कूंपण उभे केल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले. कल्याण तालुक्‍यातील बाधित गावांची पाहणी आज गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी केली. 

लोकप्रतिनिधी गायब 
पुराच्या पाण्याचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना लोकप्रतिनिधींनी अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले. उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा येथील लोकांना सर्वात मोठा फटका बसला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrations rescue 530 public