ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याची चाळण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे ऐरोली नॉलेज पार्कच्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : नवी मुंबईकरांना व मुंबईकरांना ऐरोली पुलावरून थेट ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील पटनी कंपनीच्या रस्त्यामार्गे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, भिवंडीकडे जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे. वर्षभरापूर्वी मुंब्रा बायपास रस्त्याचे काम सुरू असताना अवजड वाहनांची वाहतूक ही ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यावरूून वळवण्यात आली होती. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची चाळण झाली होती. पालिकेने या रस्त्याची त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे ऐरोली नॉलेज पार्कच्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी मुंब्रा बायपास रस्त्यांची वाहतूक ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यावरून वळवल्यानंतर या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेनंतर नवी मुंबई, मुंबई महापालिकेने या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यासाठी पहिल्यांदा निविदा काढली. त्यावेळी याला कोणत्याच कंत्राटदाराने अर्ज केला नाही. पुन्हा दुसऱ्यांचा निविदा काढल्यानंतर दोन ठेकेदारांनी अर्ज केला. मात्र, हे ठेकेदार पात्र ठरले नाहीत. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. 
मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागल्यामुळे निविदा उघडण्यात आली नाही. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाची निविदा उघडण्यात आली आहे; मात्र मान्सून सुरू झाल्यामुळे या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करता आली नाही. मान्सून सुरू होण्याच्या अगोदर रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती; मात्र संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे तात्पुरती केलेली डागडुजी फोल ठरली असून, रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.  

हा रस्ता ठाण्याकडे जाण्यासाठी शॉर्टकट असल्याने मी दुचाकीवरून येथून रोज प्रवास करतो. पण मागील वर्षी मुंब्रा बायपास रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांना जीवघेणे खड्डे पडले होते. मात्र तात्पुरती डागडुज्जी केली होती. मात्र पावसात करण्यात आलेली डागडुजी फोल ठरली असून, पुन्हा या रस्त्याला जीवघेणे खड्डे पडले असून या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. 
- राकेश मोकाशी, नागरिक. 

ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याची मान्सूनअगोदर डागडुजी करण्यात आली होती. मात्र या रस्त्यांवर खड्डे पडले असल्यास पुन्हा बुजवण्यात येतील. पावसाळा संपल्यांनतर पुन्हा या रस्त्याचे काम सुर करण्यात येईल.
- सुरेंद्र पाटील, शहर अंभियता, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aeroli Knowledge Park Road series of pits