वाशीच्या बाजारात अफ्रिकेतील हापूस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आफ्रिका खंडातील मालावी या देशातून हापूस मंगळवारी (ता. 12) वाशीतील एपीएमसी बाजारात दाखल झाला. एपीएमसीच्या फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यात हा आंबा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

नवी मुंबई, ता. 12 : आफ्रिका खंडातील मालावी या देशातून हापूस मंगळवारी (ता. 12) वाशीतील एपीएमसी बाजारात दाखल झाला. एपीएमसीच्या फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यात हा आंबा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. चव आणि रंग हुबेहुब कोकणातील हापूससारखा असणाऱ्या या आंब्याला 500 ते 700 रुपये किलोचा भाव मिळत आहे. 

आफ्रिका खंडात सध्या उन्हाळा सुरू असल्याने कोकणातील हापूसच्या आधीच मालावीतील हापूसने बाजी मारली आहे. या देशातून तब्बल 900 पेट्या हापूस एपीएमसीच्या बाजारात दाखल झाला आहे. हुबेहुब कोकणातील हापूससारखा दिसत असल्याने या आंब्याला आफ्रिकेत हापूस नावानेच संबोधले जाते. तीन ते सव्वा तीन किलो वजनाचे हे आंबे आहेत. त्याची चवही कोकणातील हापूससारखीच असल्याने बाजारात दाखल झाल्याझाल्या तत्काळ 800 पेट्यांची विक्री झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली. 
आफ्रिकेत 15 ऑक्‍टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत हापूसचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा आंबा एपीएमसी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर मार्चपासून कोकणातील हापूसचा हंगाम सुरू होणार असल्याने मालावीतील हापूसशी त्याची स्पर्धा होणार नाही, असेही सांगण्यात आले. 

असा पोहचला हापूस आफ्रिकेत... 
"मालावी मॅन्गो' या कंपनीने 10 वर्षांपूर्वी रत्नागिरी आणि दापोली येथील हापूस आंब्याच्या झाडांच्या फांद्या आयात केल्या होत्या. या फांद्यांवर संशोधन करून त्यापासून कलमे तयार करून तब्बल 1400 एकर जागेत कंपनीने शेती केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आंबा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात झाली. गतवर्षी एपीएमसी बाजारात मालावी येथून 20 टन हापूस आयात करण्यात आला होता. यंदा 100 टन आंबा येण्याची शक्‍यता व्यापारी संजय पानसरे यांनी वर्तवली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: African Hapus in Washi Market