पुर ओसल्यानंतरही 350 संसार चिखलात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जीवनावश्‍यक वस्तू भिजल्याने ग्रामस्थांचे हाल; प्रशासनातर्फे पंचनामे सुरू 

मनोर ः परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीला आलेल्या महापुराचा फटका सावरे ग्रामपंचायत परिसरातील नदीकाठच्या सुमारे 12 पाड्यांना बसला असून साडेतीनशे घरे पाण्याखाली गेली होती. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रामस्थांना रविवारची रात्र जागून काढावी लागली. सोमवारी पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थ घराकडे परतले असून घरात चिखल साचला असून संसारोपयोगी सामान भिजल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

वैतरणा नदीला आलेल्या महापुरात सावरे ग्रामपंचायत परिसरातील कुवरी पाडा, शेलार पाडा, पाचुधारा, वाणी पाडा, सासे पाडा, ब्राम्हण पाडा, दळवी पाडा, एरंबी कातकरी पाडा, धांगडा पाडा, गावठाण आणि एरंबी येथील सुमारे 350 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.

घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी भरल्यानंतर ग्रामस्थांनी उंचीवर असलेल्या घरांमध्ये आसरा घेतला होता. या भागातील दोन पोल्ट्री फार्मसह 10 ते 12 घरे पुराच्या पाण्यामुळे कोसळली. दरम्मयान महसूल विभागामार्फत दोन मंडळ अधिकारी, 10 तलाठी आणि कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

कौलांवरील पाणी पिण्याचे वेळ 
पुरामुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शेलार पाड्यातील ग्रामस्थांना कौलांवर पडणारे पावसाचे पाणी हंड्यात जमा करून उकळून पिण्याची वेळ आली आहे. घरातील तांदूळ, कपडे; तसेच किराणा सामान भिजल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the flood, 350 families still in mud at Manor near Mumbai