विक्रमगडमध्ये  "कार्टुली' महाग असूनही तेजीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

सध्या ही भाजी १०० रुपये किलो दराने विकली जात आहे. येत्या पंधरवड्यात बाजारात कार्टुलीची आवक वाढल्यावर त्याचा भाव ७० ते ८० रुपये किलो होईल.

मुंबई : पावसाळी हंगामात येणारी आणि सर्वांनाच आवडणारी कार्टुली (रानभाजी) विक्रमगड बाजारात दाखल झाली आहे. या भाजीची आवक अजूनही कमीच असल्याने सध्या ही भाजी १०० रुपये किलो दराने विकली जात आहे. परंतु, महाग असूनही कार्टुलीची खरेदी जोरात आहे. 
येत्या पंधरवड्यात बाजारात कार्टुलीची आवक वाढल्यावर त्याचा भाव ७० ते ८० रुपये किलो होईल. त्या वेळेस या भाजीचा भाव ७० ते ८० किलो असेल. ही भाजी सर्वांची आवडती असल्याने तिची जोरात खरेदी होते. त्यामुळे येथील स्थानिकांना यापासून रोजगारनिर्मिती होते. 
पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी अनेक आदिवासी स्त्री-पुरुषांचा घोळका कार्टुली शोधण्यासाठी दररोज एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात टोपली घेऊन जंगल अक्षरशः पिंजून काढतो. जंगल पिंजून झाले की जमवलेली रानभली अर्थात कार्टुली बाजार गाठून दिवसभर विकली जाते. सुरुवातीला त्यांना चांगला भावही मिळतो. ही भाजी गोळा करताना कित्येकदा त्यांना सापासारख्या प्राण्यांशी मुकाबला करावा लागतो. 

हंगाम संपेपर्यंत ग्राहक 
कार्टुली किंवा कंटवली या नावाने ही भाजी ओळखली जाते. बाहेरून हिरवीगार दिसणारी आणि साधारण हाताला न लागणाऱ्या या काटेरी भाजीची चव व स्वाद काही औरच असतो. रुचकर असल्याने ही सर्वांचीच आवडती भाजी आहे. त्यामुळे या भाजीला हंगाम संपेपर्यंत ग्राहक असतोच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after increasing rate of kartuli even now vikramgad people wants it