केडीएमटीच्या नोटिशीनंतरही गैरहजर राहणाऱ्या 24 जणांची पगार कपात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कारवाईबाबत समाधानी असून उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. 21 मे रोजी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत बैठक घेऊन केडीएमटी खासगीकरणबाबत चर्चा करणार आहे. 
- राहुल दामले, सभापती, स्थायी समिती 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील दांडीबहाद्दर 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर केडीएमटी प्रशासनाने नोटीस देऊनही गैरहजर राहणाऱ्या 24 जणांच्या वेतनात कपात केली आहे. याशिवाय प्रति दिन दंड वसुलीला सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उत्पन्नवाढीसाठीही प्रशासनाने ऍक्‍शन प्लान तयार केल्यामुळे 15 जूनपर्यत सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. 

केडीएमटीकडे वाहक 297, तर चालक 214 आहेत, तर खासगी ठेकेदाराचे 12 ते 15 कर्मचारी आहेत. विनापरवानगी 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने केडीएमटी सभापती सुभाष म्हस्के आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी अहवाल मागवत कठोर कारवाईला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात 12 वाहक आणि 12 चालक असे 24 जणांना निलंबित केले.

शुक्रवारी झालेल्या परिवहन समिती सभेनंतर टेकाळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उत्पन्नवाढीसाठी ऍक्‍शन प्लान बनवत अंमलबजावणीस सुरुवात केली. त्यात नोटीस देऊनही हजर न झालेले 11 चालक आणि 13 वाहक असे एकूण 24 जणांच्या जेवढ्या दांड्या आहेत त्या दिवसांचे वेतन कपात करत प्रति दिन दंड वसुलीला सुरुवात केली. 

केडीएमटी ऍक्‍शन प्लान 
- 15 जूनपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द 
- ओव्हरटाइम आणि सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मोबदला देणार 
- प्रति दिन उत्पन्नाची माहिती देण्यासाठी नियोजन 
- तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेणे 
- गणेश घाट डेपोमध्ये सीसी टीव्ही कॅमरा बसविणे 
- बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविणे 
- भांडार विभाग संगणकीय करणे 
- कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करून अहवाल सादर करणे 

Web Title: After the KDMT notice 24 employees of the absence of the salary cut