'त्या' मनसैनिकासाठी राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट, केली कळकळीची विनंती

पूजा विचारे
Tuesday, 18 August 2020

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. सर्व मनसैनिकांना विनंती करत धीर सोडू नका आणि संघर्ष करा. मी संघर्षाला कधीही घाबरलो नाही असा सल्ला दिला आहे.

मुंबईः नांदेडमधील मनसेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर या २७ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. सर्व मनसैनिकांना विनंती करत धीर सोडू नका आणि संघर्ष करा. मी संघर्षाला कधीही घाबरलो नाही असा सल्ला दिला आहे.  सुनील ईरावर यांना श्रद्धांजली वाहतानाच माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंतीही राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना केली आहे.

सुनील ईरावर यांनी आत्महत्या करण्याआधी राज यांना उद्देशून सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.  'साहेब जात आणि पैसा हे दोन्ही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं यापुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा', असे या सुसाइड नोटमध्ये नमूद केलं आहे. 

हेही वाचाः नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; आयुक्तांनी दिली परवानगी... व्यावसायिकांची चिंता मिटली

राज ठाकरेंनी काय लिहिलं पोस्टमध्ये

  • संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.
  • सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की 'साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा.
  • अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे. म्हणूनच ९ मार्च २००६ रोजी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरू केला. नवनिर्माणाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच १४ वर्षे आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सर्वात जास्त दमछाक होते. त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.
  • मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा... त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत... ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे... असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.
  • सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.
  • कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.

After Sunil Irawar Died Raj Thackeray Share emotional post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Sunil Irawar Died Raj Thackeray Share emotional post