अधिकृत उमेदवाराविरोधात पक्ष!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

अधिकृत उमेदवाराऐवजी ज्येष्ठ नेते दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याने पक्षाचा पाठिंबा नेमका कुणाला, याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम...

ठाणे - खारीगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय ठाकूर यांना नाकारून तिथे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जितेंद्र पाटील यांच्या बाजूने पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी उतरले आहेत. वागळे इस्टेटमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार गीता देशमुख यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रामभाऊ तायडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत थेट व्यासपीठावर स्थान दिल्याने या प्रभागात पक्षाचा नक्की पाठिंबा कुणाला आहे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

खारीगाव येथे राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्धामुळे राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळवणाऱ्या ठाकूर यांना बाजूला सारून आव्हाड यांनी आपली ताकद जितेंद्र पाटील यांच्या बाजूने उभी केली आहे. एवढेच नव्हे; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या रविवारी झालेल्या सभेतही ठाकूर यांना व्यासपीठावर प्रवेश नाकारून सभेत पाटील यांचेच झेंडे फडकावले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमधील शीतयुद्धामुळे अधिकृत उमेदवाराला विजनवासात जाण्याची वेळ आली आहे.

वागळे इस्टेटमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार गीता देशमुख यांच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या रिपब्लिकनच्या रामभाऊ तायडे यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी लाल गालिचा अंथरला आहे. इतकेच नाही तर आपल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार होत असल्याने आपला पक्ष अधिकृत उमेदवारामागे आहे की रिपब्लिकन उमेदवारामागे, असा संभ्रम भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेले संजय घाडीगावकर यांनीसुध्दा याबाबत मौन बाळगले आहे. ठाण्यात रिपब्लिकनला (आठवले गट) भाजपकडून अपेक्षित असलेल्या २० जागा न मिळाल्याने ठाणे शहर रिपब्लिकनने भाजपबरोबर असलेली युती तोडत १० जागांवर उमेदवार उभे केले. परंतु युती तुटली असतानासुध्दा शनिवारी भाजपच्या सभेच्या वेळेस रिपब्लिकनचे सगळेच्या सगळे उमदेवार मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आघाडीवर होते. एवढेच नव्हे; तर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे वागळे इस्टेटमध्ये भाजपचे शहरस्तरावरील नेते रिपब्लिकनसोबत आणि स्थानिक कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारासोबत असे चित्र दिसत आहे.

Web Title: Against the official party candidate