कळस महिला पतपेढीच्या एजंटला अटक; सभासदांची फसवणूक झाल्याचा आरोप

प्रमोद पाटील 
सोमवार, 19 मार्च 2018

कळश महिला सहकारी संस्थेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल व फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली.

पालघर - येथील कळश महिला सहकारी संस्थेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल व फसवणूक करून पळणाऱ्या संशयित आरोपी निरज वीरेंद्र भटनागर याला सफाळे पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 18) अटक करण्यात आली आहे. 

पालघर येथील वैद्यकिय सेवा करणारे डाॅ. श्रीकांत हरिराम बुध्दे (वय 58) यांचे पालघर येथे बिडको रोडवर वैशाली नर्सिंग होम आहे. डाॅ. बुध्दे यांनी सफाळे येथील शांती नगरमध्ये राहणाऱ्या निरज भटनागर याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पालघर येथील कळस सहकारी पतसंस्था या महिला पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर जास्त प्रमाणात व्याज देण्याचे आमिष दाखवून तशी जाहिरात व प्रसिद्धी केली. सदर संस्थेमध्ये एजंट बनून एजंट मार्फत सभासद बनून सभासदांकडून हफ्ताने पतपेढीत रोख रक्कम जमा केली व काहींना त्याचा प्रथम मोबदला देऊन विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर बऱ्याच जणांची फसवणूक करून कार्यालय बंद करून पोबारा केला होता, अशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी रविवारी संशयित आरोपी निरज भटनागर याला दिल्लीत अटक केली असून कळस महिला सहकारी पतसंस्थेच्या मार्फत जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सफाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकुर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पतपेढीच्या माध्यमातून बऱ्याच जणांची फसवणूक झाली असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: A agent arrested of kalas mahila matapedhi mumbai