आघाडीच्या घटक पक्षांना विधानसभेची धास्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे.

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक, आमदार रवी राणा यांच्या युवा क्रांतीला आघाडीतून एक जागा मिळाली होती.

अमरावतीत नवनीत राणा यांना विजय मिळाला. मात्र, बहुजन विकास आघाडीला पालघर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली व हातकणंगलेत पराभव स्वीकारावा लागला. यात स्वत: राजू शेट्टी यांनाही पराभवाचा धक्‍का बसल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

राज्यातील जनतेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत अद्यापही विश्‍वासाचे वातावरण नसल्याचे हे चित्र असल्याने या लहान पक्षांची कोंडी झाली आहे. आगामी विधानसभेत या महाआघाडीसोबत राहावे की वंचित बहुजन आघाडीत सहभागी व्हावे, याबाबत या पक्षांनी विचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीने सर्वच मतदारसंघांत लक्षवेधी मते घेतली आहेत. त्यामुळे, विधानसभेतही राज्यातल्या अनेक मतदारसंघांत "वंचित' फॅक्‍टर चालण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहून मतविभागणीचा फटका बसवून घेण्यापेक्षा वंचित आघाडीची सोबत करावी, असा विचार या पक्षांतील काही पदाधिकारी करत असल्याचे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aghadi Other Party Vidhansabha Election 2019 Politics