
वाशी रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूस अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात याव्यात, या मागणीसाठी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वखाली वाशी रेल्वेस्थानकाबाहेर गुरुवारी (ता.१४) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नवी मुंबई : वाशी रेल्वेस्थानकाच्या पूर्व बाजूस अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात याव्यात, या मागणीसाठी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वखाली वाशी रेल्वेस्थानकाबाहेर गुरुवारी (ता.१४) ठिय्या आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून, अनेकदा बैठका घेऊनदेखील डोळेझाक करण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती भगत यांनी या वेळी दिली.
सानपाडा-पामबीच वसाहतीतील सेक्टर-१,१३,१४,१५,१६,१६ए,१७,१८,व १९ मधील हजारो प्रवाशांच्या वतीने अनेकदा लेखी पत्रांद्वारे प्रशासनाकडे तिकीट खिडक्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासन व सिडको यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि खासदार यांच्या संयुक्त बैठका, सिडको आणि रेल्वे अधिकारी यांनी पाहणी दौरे करूनदेखील तिकीट खिडकी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.
स्थानकाच्या इमारतीत तिकीट खिडकीची मागणी असलेल्या पूर्व बाजूस, आवश्यक असलेली सर्व यंत्रणा उपलब्ध असूनदेखील रेल्वे प्रशासन तिकीट खिडकी सुरू करत नाही. येत्या १५ दिवसांच्या आत कायमस्वरूपी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली नाही, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल.
- दशरथ भगत, अध्यक्ष, पुनर्वसन सामाजिक संस्था.