शिवडी क्षयरोग रुग्णालयात कामगार सेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

निलंबित झालेल्या दोन परिचारिका व आयाला कामावर पुन्हा रुजू करण्याच्या मागणी

मुंबई : क्षयरोगग्रस्त लहान मुलांना धमकावल्याप्रकरणी निलंबित झालेल्या दोन परिचारिका व आयाला कामावर पुन्हा रुजू करण्याच्या मागणी कामगार सेनेने केलेली आहे. यासाठी बुधवारी क्षयरोग रुग्णालयात काळ्या फिती लावून कामगार सेनेने आंदोलन केले. या संपूर्ण प्रकरणाला अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे जबाबदार आहेत. त्यांना तातडीने हटवा, अशी मागणीदेखील कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुले व पालकांनी उपचारादरम्यान अचानक रुग्णालय सोडले होते. रुग्णालयात औषधे वेळेवर मिळत नाही, तसेच परिचारिकांचे वर्तन असभ्य असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांककडे दिली होती. तक्रार नोंदवल्यानंतर रुग्ण व पालक पुन्हा रुग्णालयात परतलेही होते; मात्र पालकांनी पुन्हा पालिकेकडे याविषयी तक्रार केली. त्यानंतर रुग्णालयातील दोन परिचारिका व आयाला निलंबित करण्यात आले होते. 

या प्रकरणी पालिकेने केलेल्या चौकशीत दोन परिचारिका व आया निर्दोष आढळल्याची माहिती कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली. चौकशी पूर्ण होऊनही केवळ कागदपत्रांची औपचारिकता गेल्या दोन महिन्यांपासून पुर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिचारिक व आयाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे कदम यांनी सांगितले. हे सर्व प्रकरण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी घडवून आणल्याचा आरोपही कदम यांनी केला. 

...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल 
तिन्ही महिला कर्मचा-यांना पालिका जोपर्यंत कामावर घेत नाही व डॉ. आनंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत नाही तोपर्यंत कामगार सेनेकडून निषेध आंदोलन सुरु राहील, असे कदम यांनी सांगितले. पालिकेने योग्य ती कार्यवाही न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही कदम यांनी दिला.

तर या प्रकाराबाबत पालिकेने काहीच माहिती दिली नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation at Shivdi TB Hospital