‘एमपीसीबी’चे नाक चोंदले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नवी मुंबई  - शहरातील वायुप्रदूषण वाढले आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याचे सफर या संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. ‘सकाळ’ने जुईनगर, सानपाडा, घणसोलीत सोमवारी मध्यरात्री केलेल्या पाहणीतही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक वायूच्या लोटामुळे धुरके पसरत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रदूषणामुळे डोळे चुरचुरणे, श्‍वास घेण्यास त्रास, घसा खवखवणे अशा कारणांमुळे रहिवाशांना घरांच्या खिडक्‍या बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असेही पाहणीत दिसून आले. दुसरीकडे प्रदूषणासंदर्भात रहिवाशांच्या तक्रारी खोट्या असल्याचा अजब दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

नवी मुंबई  - शहरातील वायुप्रदूषण वाढले आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याचे सफर या संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. ‘सकाळ’ने जुईनगर, सानपाडा, घणसोलीत सोमवारी मध्यरात्री केलेल्या पाहणीतही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक वायूच्या लोटामुळे धुरके पसरत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रदूषणामुळे डोळे चुरचुरणे, श्‍वास घेण्यास त्रास, घसा खवखवणे अशा कारणांमुळे रहिवाशांना घरांच्या खिडक्‍या बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असेही पाहणीत दिसून आले. दुसरीकडे प्रदूषणासंदर्भात रहिवाशांच्या तक्रारी खोट्या असल्याचा अजब दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. त्यामुळे मंडळाचे नाक चोंदले आहे का, असा प्रश्‍न रहिवासी उपस्थित करत आहेत. 

मुंबईसह नवी मुंबईतील प्रदूषणात गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. नवीन इमारतींचे बांधकाम, वाहनांचे वाढते प्रमाण आणि शहरातील रासायनिक कंपन्यांमधून बाहेर पडणारा विषारी धूर यामुळे रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. ‘सफर’ने शहरातील हवेची गुणवत्ता मोजल्यानंतर दिल्लीतील प्रदूषणापेक्षा जास्त प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. 

‘सकाळ’ने सानपाडा, जुईनगर, वाशी, घणसोली, नोसील नाका येथील रहिवाशांबरोबर प्रदूषणाच्या त्रासाबाबत चर्चा केली. त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर पाहणी केली असता साधारणपणे तीन मजली इमारतींच्या उंचीपर्यंत धुराचे लोट दिसले. जुईनगर रेल्वेस्थानकापलीकडच्या कारखान्यांमधून बाहेर पडणारा वायू सानपाडा आणि जुईनगर परिसरातील इमारतींच्या परिसरात होता. त्यामुळे रहिवाशांना श्‍वास घेणे कठिण झाले.

रात्री परिसरात उग्र वास येतो. कुजलेल्या पदार्थाप्रमाणे तो असतो. मध्यरात्री या वासाची तीव्रता वाढते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती वाटते. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे तपासले पाहिजे.
- नमिता कटारे, रहिवासी, गोरबंध सोसायटी, सेक्‍टर- १५, सानपाडा

सानपाडा परिसरात रात्री मोठ्या प्रमणात धूर पसरलेला असतो. त्याचा उग्र वास असतो. त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो. नाइलाजामुळे रहिवाशांना घराच्या खिडक्‍या बंद कराव्या लागतात. हिवाळ्यात हा त्रास वाढतो.
- समीर शहा,  भूमी पॅराडाईज, सचिव, सानपाडा

हवेच्या प्रदूषणाबाबत तपासणी केली आहे. अधिकाऱ्यांना प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रसामग्रीसह प्रदूषणाच्या तक्रारी असलेल्या भागात पाठवले होते; पण कुठेही प्रदूषण असल्याचे जाणवले नाही. रहिवाशांच्या तक्रारी खोट्या आहेत. रात्रभर फिरल्यानंतर पथकाला प्रदूषण दिसले नाही. तुमचे म्हणणेही प्रदूषण आहे असे असेल तर दोन दिवसांनी पुन्हा क्षेत्र अधिकाऱ्यांना संबंधित परिसराची तपासणी करण्यास सांगतो.
- अनंत हर्षवर्धन,  उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ

तीन दिवसांत १५ सिगारेट
नवी मुंबईत आजही प्रदूषणाची पातळी धोकादायक आहे. एका सिगारेटमधून २२ मिलिग्रॅम क्‍युबिक मीटर तरंगते धूलिकण (पीएम २.५) मानवी शरीरात जातात. तीन दिवसांपासून या शहरातील हवेत तरंगत्या धलिकणाचे प्रमाण साधारणत: ३४१ मिलीग्रॅम प्रत्येक क्‍युबिक मीटर एवढे आहे. त्यामुळे  १४ ते १५ सिगारेटच्या दुष्परिणामाएवढा प्रदूषित वायू रहिवाशांच्या फुप्फुसात गेले आहे.

Web Title: air pollution in navi mumbai