विमानतळ प्रकल्पग्रस्त मतदानाला मुकणार?  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

 आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या वेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या या गावांच्या मतदान केंद्रांची माहितीच अद्याप प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त या वेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मुकण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या या गावांच्या मतदान केंद्रांची माहितीच अद्याप प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

विमानतळासाठी पनवेल तालुक्‍यातील चिंचपाडा, पारगाव डुंगी, वरचे ओवळे, कोंबडभुजे, गणेशपुरी, वाघिवली वाडा, उलवे, तरघर, कोल्ही आणि कोपर ही दहा गावे विस्थापित झाली आहेत. २०१९ अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत विमानतळाची पहिली धावपट्टी तयार करण्याचे ध्येय सिडकोचे आहे. त्यामुळे दहा गावांतील ९५ टक्के गावांमधील घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबे पनवेल, वडघर, करंजाडे, उलवे वसाहत, गव्हाण आदी भागात वास्तव्य करत आहेत. त्यांच्यासमोर आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि ग्रामपंचायतींच्या इमारतींमध्ये मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता नव्हती. परंतु आता गावे स्थलांतरित झाल्याने शाळा व ग्रामपंचायतींच्या इमारती जमीनदोस्त केल्या आहेत, त्यामुळे मतदानाचा प्रश्‍न आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

मतदान कुठे होणार आहे, याची माहितीच अद्याप स्थानिक तहसील आणि प्रांत कार्यालयातून देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

अधिकारीही याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत नाहीत. त्यामुळे संभ्रम आहे. दरम्यान, या हलगर्जीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील तब्बल दहा हजारपेक्षा अधिक नागरिक मतदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्याबरोबर चार दिवसांपासून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाड परंतु त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

आघाडीच्या उमेदवाराला फटका?
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांमध्ये सरकारवर रोष आहे. तसेच या गावांतील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मानणारा मतदारवर्ग आहे. परंतु तो विखुरला गेल्याने आणि त्यांच्यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात उरण तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना अपयश आल्याने त्याचा फटका आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना बसण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Airport Project Affected will be lost for the voting