अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. एका बाजूला शरद पवार भाजपशी दोन हात करत असताना, अजित पवार यांनी घेतलेला निर्णय, चुकीचा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणानं आज, आतापर्यंतचा सगळ्यांत मोठा धक्का पाहिला. कालपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणारे अजित पवार यांनी, देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. एका बाजूला शरद पवार भाजपशी दोन हात करत असताना, अजित पवार यांनी घेतलेला निर्णय, चुकीचा असल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या सहा वर्षांत अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन मोठ्या चुका केल्या आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. वाचा काय आहेत अजित पवार यांच्या चुका. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

Image may contain: 1 person, closeup

धरणात पाणी नाही तर, मुतायचं काय?
7 एप्रिल 2013 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी धरणात पाणी नाही तर, मुतायचं काय? असं वक्तव्य एका सार्वजनिक सभेत केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी मुंबईत आझाद मैदान येथे 55 दिवस उपोषण केलं होतं. त्या उपोषण आंदोलनाची खिल्ली अजित पवार यांनी  उजवली होती. '55 दिवस उपोषण करून पाणी मिळाले का? पाणीच नाही तर मुतायचे का?', असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. मीडियामधून तसेच विरोधकांनी अजित पवार यांना धारेवर धरल्यानंतर अजित पवार यांनी कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेष केला होता. 

Image may contain: one or more people and text

आमदारकीचा राजीनामा 
सप्टेंबर 2019मध्ये राज्य शिखर बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं शरद पवार ईडी कार्यालयात गेले नाही. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या या नाट्यानंतर शरद पवार यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात चीड निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरले होते. राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण तयार होत असताना अवघ्या तीन तासांत अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देत, संपूर्ण फोकस शरद पवार यांच्यावरून स्वतःवर करून घेतला. राजकारणातून सन्यास घेण्याची भाषा केली होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही नंतर अजित पवार यांचीही चूक होती, असं मान्य केलं होतं. दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात अजित पवार रडलेही होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून विक्रमी विजय मिळवला होता. 

Image may contain: 3 people, including Pratap Patil, people standing, people on stage and indoor

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 
आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील एकाही नेत्याला विश्वासात न घेता अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदारांना फोडून भाजपच्या सोबतीने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन ते राज भवनात शपथ घेण्यासाठी गेले होते. त्यातील सर्व आमदार राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. त्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवरील बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळं अजित पवार यांचं बंड फसल्याचं स्पष्ट झालंय. भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापनेचा अवधी देण्यात आला असला तरी, सभागृहात बहुमत सिद्ध करणं भाजपला शक्य होणार नाही, असं स्पष्ट दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar and his three mistakes in political career